जाणून घ्‍या मागील आठवड्यात शेअर बाजारात काय घडलं? | पुढारी

जाणून घ्‍या मागील आठवड्यात शेअर बाजारात काय घडलं?

सुमारे तीन आठवडे सर्वोच्च विक्रमी पातळीपर्यंत घुटमळल्यानंतर निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने अखेर नवा विक्रम (लाईफ टाईम हाय) प्रस्थापित केला. गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक अनुक्रमे एकूण 523.55 आणि 1739.19 अंकांनी वधारून 19189.05 अंक व 64718.56 अंकांवर बंद झाले. शुक्रवारच्या सत्रात निफ्टीने 19201.7 अंक तर सेन्सेक्सने 64768.58 अंकांच्या सवोर्र्च्च पातळीला स्पर्श केला. सप्ताहात निफ्टी निर्देशांक एकूण 2.8 टक्के तर सेन्सेक्स निर्देशांक 2.76 टक्के वधारला. निफ्टी व सेन्सेक्सला सर्वोच्च पातळी पार करून नेण्यात जवळपास सर्वच कंपन्यांच्या समभागांचा (Broad Based Rally) होता; परंतु प्रामुख्याने एकूण सप्ताहाचा विचार करता इंडसिंड बँक (8.01 टक्के), सन फार्मा (6.16 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (5.43 टक्के) डॉ. रेड्डीज (5.31 टक्के), टाटा मोटर्स (4.60 टक्के) या कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली तर बीपीसी एल (2.33 टक्के) झी एंटरटेन्मेंट (1.17 टक्के), वेदांता (0.96 टक्के) या कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक घट झाली.

बॉम्बेस्टॉक एक्स्चेंजचे भांडवल बाजारमूल्य (मार्केट कॅप) देखील यामुळे शुक्रवारअखेर विक्रमी पातळीवर म्हणजेच 296 लाख कोटींवर पोहोचले. जूनच्या दुसर्‍या पंधरवड्यात मान्सून देशभर सर्वदूर पसरल्याने दुष्काळाचे संकट टळल्याने त्याचे पडसाद भांडवल बाजारात उमटले. परदेशी गुंतवणूकदारांनीदेखील केवळ जून महिन्यात 3 अब्ज डॉलर्सची खरेदी (सुमारे 24 हजार कोटी) भारतीय भांडवल बाजारात केली. मागील चार महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 11 अब्ज डॉलर्सची (सुमारे 88 हजार कोटी) भारतीय भांडवल बाजारात खरेदी केली. या सर्वांचा एकत्रित परिणाम निफ्टी व सेन्सेक्स विक्रमी पातळीवर जाण्यात झाला.

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन कंपन्यांच्या एकत्रित विलीनीकरणास (मर्जर) अखेर दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांकडून बैठकीमध्ये मान्यता 1 जुलैपासून एकच एचडीएफसी बँक कंपनी अस्तिवात आली. सुमारे वर्षभरापूर्वी 4 एप्रिल 2022 रोजी या कंपन्यांच्या एकत्रिकीकरणाचा निर्णय घोषित करण्यात आला. यासाठी 15 ते 18 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या दोन कंपन्यांचे एकत्रित भांडवल बाजार मूल्य 18 लाख कोटीपेक्षा अधिक आहे. निफ्टी निर्देशांकामध्ये देखील याचे वजन (weighting) 14 टक्क्यांपर्यंत असेल. या एकत्रिकीकरणामुळे एचडीएफसी बँक जगातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकाची बँक बनेल. आपली प्रतिस्पर्धी आयसीआयसीआय बँकेपेक्षा एचडीएफसी बँकेचा आकार दुपटीने मोठा असेल. एचडीएफसी लिमिटेडच्या प्रत्येकी 25 समभागांबदल्यात गुंतवणूकदारांना एचडीएफसी बँकेचे 42 समभाग (शेअर्स) मिळणार. एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांची एचडीएफसी बँकमध्ये 41 टक्के मालकी असेल.

जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर 0.10 टक्के ते 0.30 टक्क्यांवरून 6.5 टक्के करण्यात आला तर यापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींचा दर पूर्वीपेक्षा 0.10 टक्क्यांनी वाढवला.

एप्रिल-मे महिन्यात भारताची वित्तीय तूट (करंट अकाऊंट डेफिसिट)2.10 लाख कोटींवर सरकारने एकूण केलेला खर्च सरकारकडे कर स्वरूपात जमा झालेला महसूल यातील फरक म्हणजे वित्तीय तूट. एप्रिल-मे या दोन महिन्यांत सरकारकडे 4.16 लाख कोटींचा महसूल जमा झाला तर याच कालावधीत 6.26 लाख कोटींचा खर्च झाला. या चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 17.87 लाखांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे ही तूट दोन महिन्यांत या उद्दिष्टाच्या 11.8 टक्क्यांपर्यंत पोहोचली. कमीत कमी वित्तीय तूट अर्थव्यवस्थेसाठी पोषक मानली जाते.

जीक्यूजी पार्टनर्स या अमेरिकेच्या गुंतवणूकदार उद्योग समूहाने अदानी समूहाच्या दोन कंपन्या अदानी एंटरप्राईझेस व अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 8372 कोटी रुपये गुंतवले. जीक्यूजी पार्टनर्सने अदानी एंटरप्राईझचे 18 दशलक्ष समभाग (शेअर्स) खरेदी करून 1.6 टक्के हिस्सा तर अदानी ग्रीनचे 46 दशलक्ष समभाग खरेदी करून 2.9 टक्के हिस्सा खरेदी केला.

‘सेबी’ या बाजार नियामक संस्थेने टाटा मोटर्सची उपकंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजीस’ला आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरण्यास संमती दिली. टाटा मोटर्सचा टाटा टेक्नॉलॉजीमध्ये 74.69 टक्के हिस्सा प्रवर्तकांमार्फत (प्रोमोटर्स) आयपीओमध्ये 95.11 समभाग विक्री केले जाणार. यापूर्वी टाटा समूहातर्फे दशलक्ष टीसीएसचा जुलै 2004 मध्ये ‘आयपीओ’ आला होता. यानंतर तब्बल 19 वर्षांनी टाटा समूहाची एखादी कंपनी आयपीओद्वारे भांडवल बाजारात येत आहे. किंमतपट्टा तसेच सूचीबद्ध होण्याची तारीख (लिस्टिंग डेट) याबद्दल सविस्तर माहिती येणे बाकी आहे.

टीसीएसमधील कथित/कर्मचारी भरती घोटाळाप्रकरणी सहा कर्मचारी आणि कर्मचारी भरती करणार्‍या सहा संबंधी संस्था यांच्यावर टीसीएसने बंदी आणली. टीसीएसमध्ये नोकरी देण्यासंबंधी पैसे मागितल्याच्या दोन तक्रारी भारत आणि अमेरिकेतून आल्या होत्या. यावर टीसीएसमधील वरिष्ठ कर्मचारी चौकशी करत असून याची गंभीर दखल कंपनीतर्फे घेण्यात आली आहे.

शापूरजी पालनजी उद्योग समूहाने काही खासगी गुंतवणूकदारांमार्फत 14300 कोटींचा निधी नॉनकन्व्हर्टीबल डिचेंबर्स स्वरूपात उभा केला. यासाठी 18.75 टक्क्यांचा व्याजदर आणि 2 वर्षांच्या कालावधीचे रोखे जारी करण्यात आले आहेत. रोख्यांची हमी म्हणून शापूरजी पालनजीचे टाटा सन्समधील समभाग (शेअर्स) गहाण ठेवण्यात आले आहेत.

एअर इंडिया आणि विस्तारा कंपनीच्या विलीनीकरणाबाबत भारतीय स्पर्धा आयोग (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ची दोन्ही कंपन्यांना नोटीस. उत्तर देण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी. सध्या देशांतर्गत हवाई वाहतुकीमध्ये इंडिगोचा 61.4 टक्के हिस्सा. एअर इंडिया व विस्तारा विलीनीकरण झाल्यास त्यांचा एकत्रित हिस्सा 18 टक्के त्यामध्ये टाटा समूहाचा हिस्सा असलेली एअर एशियाचा हिस्सा मिळून ही हिस्सेदारी 26 टक्क्यांपर्यंत जाईल म्हणजेच टाटा समूह आणि इंडिगो या दोघांची देशांतर्गत हवाई वाहतुकीमध्ये 85 टक्क्यांपर्यंत हिस्सेदारी निर्माण होऊन दोनच कंपन्यांची या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका आयोगाला वाटतो. त्यामुळे विलीनीकरणापूर्वीच काही बाबींचा खुलासा मागण्यासाठी आयोगाने नोटीस धाडली.

वेदांता – फॉक्सकॉन यांचा 28 नॅनोमीटर आकाराची सेमीकंडक्टर चीप बनवण्यासाठी प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारित प्रस्ताव. केंद्र सरकारने सेमीकंडक्टर चीप बनवण्यासाठी 76 हजार कोटींची योजना जाहीर केली. या पाठोपाठ मागील आठवड्यात मॅक्रॉन या अमेरिकेच्या कंपनीचे यासाठी 2.75 अब्ज डॉलर्सचा प्रकल्प भारतात उभा करण्याची घोषणा केली. आता यासोबतच अ‍ॅपल फोनची निर्मिती करणार्‍या फॉक्सकॉनने देखील चीपनिर्मितीत स्वारस्य दाखवले आहे.

आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘एस अँड पी’ने भारताचा अर्थव्यवस्था वृद्धी दर अंदाज चालू आर्थिक वर्षात 6 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.खनिज तेलाच्या किमतीत सलग चौथ्या तिमाहीत घट जून तिमाही बे्रंट क्रूडच्या किमतीत एकूण 6 टक्क्यांची घट होऊन शुक्रवारअखेर खनिज तेल 74.90 डॉलर प्रतिबॅरल किमतीवर स्थिरावले. अमेरिकेचे डब्लूटीआय क्रूड देखील या तिमाहीत 6.5 टक्के घटून 70.64 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषतः चीनमधील मंदीमुळे आणि प्रगत राष्ट्रांचा ओढा पर्यावरण अनुकूल ऊर्जास्रोतांकडे वाढत चालल्याने खनिज तेलाची मागणी घटत असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत.

23 जून रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.901 अब्ज डॉलर्सनी घटून 593.198 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.

Back to top button