अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* एलआयसीचा आयपीओ 10 मार्च 2022 रोजी भांडवलबाजारात येण्याची शक्यता. 14 मार्चपर्यंत हा आयपीओ सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार असल्याचा अंदाज. सध्या असलेल्या कच्च्या मसुद्यानुसार इश्यूचा आकार 65 हजार कोटींचा असून, सरकार आपली 5 टक्के हिस्सेदारी बाजारात विकणार. या कच्च्या मसुद्यानुसार किंमतपट्टा 2000-2100 दरम्यान राहणार असून 7 समभागाचा एक लॉट असणार आहे. एकूण सुमारे 31.62 कोटी समभाग जारी केले जाणार.

‘एलआयसी’च्या पॉलिसीधारकांसाठी आयपीओच्या किमतीमध्ये सुमारे 10 टक्क्यांची सवलत मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या एलआयसीची एंबेडेड व्हॅल्यू 5.4 लाख करोड असून, बाजार नोंदणीपश्चात कंपनीचे भांडवल बाजारमूल्य रिलायन्सपेक्षादेखील मोठे असण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला.

* गतसप्ताहात भारतीय भांडवल बाजारावर रशिया-अमेरिका यांच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाचे सावट राहिले. एकूण सप्ताहाचा विचार करता निफ्टीमध्ये 98.45 अंकांची घसरण होऊन निफ्टी 17276.3 अंकांच्या पातळीवर, तर सेन्सेक्समध्ये 319.95 अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स 57832.97 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी व सेन्सेक्समध्ये एकूण अनुक्रमे 0.57 टक्के व 0.55 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. केवळ सप्ताहाअखेर शुक्रवारच्या दिवसाचा विचार करता निफ्टीमध्ये 28.30 अंक (म्हणजेच 0.16 टक्के) तर सेन्सेक्समध्ये 59.04 अंक (म्हणजे 0.1 टक्के) घसरण पाहायला मिळाली.

* राष्ट्रीय शेअरबाजार (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज)च्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांची सीबीआयकडून चौकशी तसेच त्यांचे माजी सहकारी सीईओ रवी नारायणन आणि माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांचीदेखील यांच्या विरोधातदेखील देश सोडून जाण्यावर बंदी आणणारी ‘लूक आऊट नोटीस’ जारी करण्यात आली आहे. दिल्लीस्थित काही निवडक शेअरबाजारातील दलाल पेढींना इतरांपेक्षा अधिक वेगाने एक्स्चेंजमधील डाटा (माहिती) उपलब्ध होईल आणि त्यांच्यामार्फत अधिक वेगाने व्यवहार होतील, अशी (कोलोकेशन फॅलिलिटी) व्यवस्था उपलब्ध इतरांपेक्षा करून दिल्याचा आरोप आहे.

2010-2012 दरम्यानचा हा घोटाळा आहे. सुब्रमण्यम यांची पत्नी यांचीदेखील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू. एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण या एक्स्चेंजमधील गोपनीय माहिती हिमालयातील कथित संन्याशाकडे उघड करत होत्या, असा ठपका बाजार नियामक ‘सेबी’ने त्यांच्यावर ठेवला आहे. लवकरच या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार तपासप्रकरणी ‘ईडी’देखील लक्ष घालणार असल्याचे समजते.

* देशातील प्रमुख प्रवासी विमानवाहतूक सेवा पुरवणारी कंपनी ‘इंडिगो’चे सहप्रवर्तक राकेश गंगावाल पुढील 5 वर्षांत कंपनीमधील संपूर्ण 33.61 टक्के हिस्सा विकणार तसेच संचालक मंडळाच्या पदांचा राजीनामा देणार. इंडिगो कंपनीमध्ये त्यांचा सुमारे 29,900 कोटींचा हिस्सा. कंपनीचे प्रवर्तक राहुल भाटिया ज्यांच्याकडे सध्या इंडिगो (इंटरग्लोब एव्हिएश) कंपनीचा 38 टक्के हिस्सा आहे. त्यांच्याशी असलेले मतभेद या राजीनाम्याचे कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

* व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ही कंपनीतील महत्त्वाची पदे एकाच व्यक्तीला देण्याविरोधातील निर्णयावर बाजारनियामक संस्था ‘सेबी’चे घूमजाव. 2017 मध्ये उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या संचालक मंडळाचे निर्णय अधिक पारदर्शक बनवण्याच्या हेतूने एमडी व सीईओ ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीला बहाल करता येणार नाही, असा नियम सुचवला होता.‘सेबी’ने हा नियम एप्रिल 2022 पर्यंत अंमलात आणण्याचे आदेश देशातील सर्वात मोठ्या 500 कंपन्यांना दिले होते. परंतु 500 कंपन्यांपैकी केवळ 54 टक्के कंपन्यांनी याची अंमलबजावणी केली. आता मुदत संपण्यास केवळ दीड महिना असताना सेबीने घूमजाव करत हा निर्णय कंपन्यांसाठी ऐच्छिक असल्याचे जाहीर केले.

* दूरसंचार कंपन्यांनी आपल्या रिर्जा पॅकमध्ये दरवाढ केल्याचा सर्वाधिक फटका ‘रिलायन्स जिओ’ला बसला. कंपनीने 13 दशलक्ष (सुमारे 1.30 कोटी) ग्राहक डिसेंबर महिन्यात गमावले. याउलट प्रतिस्पर्धी एअरटेलने सुमारे 4 लाख 75 हजार नवीन ग्राहक कंपनीशी जोडले. खाजगी कंपन्यांच्या दरवाढीचा सर्वाधिक फायदा सरकारी कंपनी ‘बीएसएनएल’ला झाला. ‘बीएसएनएल’ने या काळात तब्बल 11 लाखांपेक्षा अधिक नवीन ग्राहक जोडले.

* जानेवारी महिन्यात किरकोळ महागाईवर 6.01 टक्क्यांपर्यंत पोहोचला. मागील 7 महिन्यांचा हा उच्चांक आहे. आयात केलेले खाद्यतेल तसेच अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती महागाईस कारणीभूत ठरल्या. तसेच घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय इन्प्लेशन) 12.96 टक्क्यांपर्यंत कायम राहिला. डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईदराने 14.87 टक्क्यांसह मागील 30 वर्षांचा उच्चांक गाठला होता.

* शुक्रवारच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 40 पैसे मजबूत होऊन 74.66 रुपये प्रतिडॉलरच्या किमतीवर बंद झाला. रशिया-अमेरिकेमध्ये युक्रेन विषयावर तणाव निवळण्याची शक्यता तसेच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घट रुपायाच्या मजबूत होण्यास कारणीभूत ठरली.

* अ‍ॅक्सिस बँक, सिटी बँकेचा भारतातील रिटेल बँकिंग उद्योग विकत घेण्यासाठी प्रयत्नशील. सुमारे 2.5 अब्ज डॉलर्सचा व्यवहार होण्याची शक्यता लवकरच रिझर्व्ह बँकेची या व्यवहारास मान्यता अपेक्षित. सध्या सिटी बँकेकडे भारतात 2.5 दशलक्ष ग्राहक असून 1.2 दशलक्ष ख्याती आहेत.

* देशातील प्रमुख उद्योग समूह वेदांता लवकरच इलेक्ट्रॉनिक चीप उत्पादन क्षेत्रात उतरणार. यासाठी एकूण 20 अब्ज डॉलर्स (1.5 लाख कोटींची) गुंतवणूक हा उद्योगसमूह करणार असून 2024-25 पर्यंत भारतीय कारखान्यांमधून इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर चीपचे उत्पादन सुरू होणार.

* डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत सरकारी कंपनी ‘कोलइंडिया’चा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 47.7 टक्के वधारून 3085.39 कोटींवरून 4558.39 कोटीपर्यंत पोहोचला. महसूलदेखील 23686.03 कोटींवरून 28433.50 कोटी झाला.

* 11 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारतमाची परकीय गंगाजळी 1.763 अब्ज डॉलर्सने घटून 630.19 अब्ज डॉलर्स झाली.

प्रीतम मांडके

Back to top button