Obesity | अतिलठ्ठ आहात! ‘इतक्या’ मिनिटांचा करा जोरकस व्यायाम, वजन राहील नियंत्रणात | पुढारी

Obesity | अतिलठ्ठ आहात! 'इतक्या' मिनिटांचा करा जोरकस व्यायाम, वजन राहील नियंत्रणात

डॉ. प्राजक्ता पाटील

आरामदायक जीवनशैली, व्यायामाचा अभाव याचा परिणाम म्हणजे अतिलठ्ठपणा. त्यामुळे जर तुम्ही अतिलठ्ठ असाल, केवळ हृदयरोग नव्हे; तर अनेक आजारांना तुम्ही बळी पडू शकता. भले हे आजार छोट्या स्वरूपातील असतील, ते घातक ठरू शकतात. (Obesity)

संबंधित बातम्या 

अतिलठ्ठपणा ही सध्या सर्वच वयोगटातली समस्या आहे. सुमारे 65 लाख प्रौढ आणि 10 लाख मुले या अतिलठ्ठपणाने त्रस्त आहेत. हा एक आजारच आहे, असे म्हणावे लागेल. किंबहुना, हा आरोग्याच्या दृष्टीने घातक असा आजार आहे. अतिलठ्ठपणा तुमचे आयुष्य कमी करतो. काही प्रसंगात तो मृत्यूचे कारणही ठरू शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह यांना आमंत्रण देणारा असतो. अतिलठ्ठपणा हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकतो.

हृदयाला ज्या धमन्यांमधून रक्तपुरवठा होतो, त्यांच्या आत मेणासारखा पदार्थ तयार होतो, हृदयाच्या त्या अवस्थेला कोरोनरी हार्ट डिसीज असे म्हटले जाते. या धमन्या हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात. या धमन्यांमध्ये जमलेला हा मेणासारखा पदार्थ धमन्यांना आकुंचित किंवा बंद करू शकतो. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. अतिलठ्ठपणा हृदयाची धडधड बंद पाडू शकतो.

ही आत्यंतिक गंभीर स्थिती असते. यामध्ये हृदय बंद पडल्यामुळे शरीराला रक्तपुरवठा होत नाही. याखेरीज अतिलठ्ठपणामुळे व्हेरिकोज व्हेन्स, पाठदुखी, कंबरदुखी, पायदुखी यासारख्या समस्या नित्यनेमाने जाणवत राहतात. महिलांसाठी तर अतिलठ्ठपणा अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण करणारा ठरतो.

काही अभ्यासकांच्या मते, अतिलठ्ठपणामुळे कॅन्सर होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी वाढते. स्त्रियांचे वजन जर त्यांच्या निर्धारित वजनापेक्षा नऊ किलोंनी जास्त असेल, तर त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. ( Obesity )

यावर उपाय म्हणजे नियमित व्यायाम करा. आठवड्याला 150-300 मिनिटांचा जोरकस व्यायाम तुमचे वजन नियंत्रणात ठेवेल. पोहणे, भरभर चालणे, सायकलिंग यासारख्या शारीरिक श्रमाचे व्यायाम तुम्ही करणे गरजेचे आहे. आरोग्यदायी आहाराचे नियोजन करा. फळे, भाज्या, सालाची धान्ये इ. कमी उष्मांक, पोषक आहाराचा त्यात समावेश करा.

Back to top button