लठ्ठपणामुळे अकाली मृत्यूचा धोका ९१ टक्क्यांपर्यंत वाढतो | पुढारी

लठ्ठपणामुळे अकाली मृत्यूचा धोका ९१ टक्क्यांपर्यंत वाढतो

न्यूयॉर्क : बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या विचित्र सवयी यामुळे सध्या जगभरातच लठ्ठपणाची समस्या गंभीर बनली आहे. शरीरात अधिक प्रमाणात फॅटस् म्हणजेच चरबी साठल्याने शरीराचे अनेक भाग असंतुलित होतात आणि त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. लठ्ठपणामुळे अकाली मृत्यूचा धोका 91 टक्क्यांपर्यंत वाढतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधनातून दिसून आले आहे की ‘हाय बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा लोकांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होतात. त्यामुळे त्यांचा लवकर मृत्यू होण्याचा धोकाही वाढतो. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरमधील रेयान मास्टर्स यांनी सांगितले की जोपर्यंत बीएमआय उच्च होत नाही तोपर्यंत मृत्यू दराचा धोका वाढत नाही. ‘बीएमआय’ केवळ वजन आणि उंची यावर आधारित असते. शरीराच्या संरचनेमधील अंतर किंवा एखाद्या व्यक्तीचे वजन किती काळापासून अधिक आहे याचा हिशेब यामध्ये ठेवलेला नसतो. वजन वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते. फळे, भाज्या, धान्य, दूध-दही असा आहार, नियमित व्यायाम, सकाळचा नाश्ता, चांगली झोप व तणावरहीत दिनचर्या यामुळे माणसाचे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

Back to top button