वयाच्या पस्तिशीपर्यंतच बाप व्हा! | पुढारी | पुढारी

वयाच्या पस्तिशीपर्यंतच बाप व्हा! | पुढारी

अमित शुक्ल

डॉक्टर नेहमीच सल्ला देतात की, निरोगी मूल जन्माला यावे यासाठी महिलांनी 35 वर्षे वयापूर्वी आई व्हावे; पण नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार पुरुषांनीही पस्तिशीपर्यंत बाप होणे फायदेशीर आहे. पस्तिशीपर्यंत पिता झाल्यास होणार्‍या मुलामध्ये आजारपण येण्याचा धोका कमी असतो. 

आतापर्यंत जास्त वयाच्या महिलांचे गर्भारपण हे बाळाच्या आरोग्यासाठी जास्त धोकादायक असते, असे मानले जात होते; पण पुरुषांच्या बाबतीत मात्र अशा प्रकारची कोणतीही गोष्ट ऐकिवात नव्हती. मात्र, नुकत्याच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, वडिलांच्या वयाचा परिणाम मुलाच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाढत्या वयाबरोबर पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता कमी होत जाते. त्यामुळे जन्मणार्‍या मुलांमध्ये आजारपणाची शक्यता वाढते.  

संबंधित बातम्या

बायोलॉजिकल सायकाईट्री नावाच्या विज्ञान मासिकात छापण्यात आलेल्या संशोधनानुसार वडिलांचे वय जास्त असल्यास त्याचा थेट संबंध स्किझोफ्रेनियाशी असल्याचे म्हटले जाते. स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्तीची वर्तणूक असामान्य असते. कोणत्याही गोष्टी समजून घेणे किंवा विचार करणे यासाठी अशा व्यक्तींमध्ये तार्किक क्षमता राहत नाही. संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, पिता होण्याच्या वयामध्ये दर दहा वर्षांची वाढ मुलांमध्ये स्किझोफ्रेनियाचा धोका 30 टक्क्यांनी वाढवणारी ठरते. संशोधनानुसार चाळीस वर्षे वयापेक्षा अधिक वयात बाप बनल्यास त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझमचा धोका 5.75 टक्के अधिक नोंदवला गेला आहे. त्याशिवाय, या मुलांमध्ये एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर, सायकोसिस, बायपोलर डिसऑर्डर आदी धोकेही नोंदवले गेले आहेत. 

सर्वेक्षणासाठी 2007 ते 2016 वर्षांदरम्यान जन्मलेल्या चार कोटींहून अधिक मुलांची आकडेवारी जमा केली गेली. त्यानुसार उशिरा बाप बनलेल्या व्यक्तींच्या मुलांना जन्मतःच आयसीयूमध्ये ठेवण्याचे प्रमाण अधिक होते किंवा त्यांचा जन्म वेळेच्या आधी झाल्याचे दिसून आले. तसेच अशा मुलांचे वजनही 35 वर्षे वयातील पित्यांच्या मुलांपेक्षा कमी होते. 

एकूणच आई-वडील दोघांचेही वय 35 वर्षांपेक्षा कमी असेल तर बाळाचे आरोग्य चांगले राहते.  

Back to top button