तुमच्या बाळाला द्या ‘हा’ आहार | पुढारी

तुमच्या बाळाला द्या ‘हा’ आहार

पुढारी ऑनलाईन

बाळ जन्माला आले की आई आणि बाबांना हुरहूर लागते ती बाळाला आहार काय द्यायचा. बाळ काही खातच नाही, बाळाचे वजन वाढतच नाही अशा तक्रारी पालक करत असतात. त्यामुळे बाळ जे खाईल ते दिले जाते. बेकरी प्रॉडक्ट जास्त करून बाळाला दिले जातात. त्यामुळे बाळाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम दिसतात. त्यामुळे आहाराकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. 

तज्ज्ञ डॉक्टरांचे ऐका

बाळाला वरचा आहार कधी सुरू केला पाहिजे याबाबत बालरोग तज्ज्ञांशी बोला. जन्मल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात बाळाला गुटी, साखरपाणी, ग्राईप वॉटर, गायी-म्हशीचे दूध, दूध पावडरचे दूध पाजू नये. दुधाची बाटली वापरू नये, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहिले सहा महिने आईचे दूध हेच अमृत असते.  

बाळाचे वजन

बाळाचे वजन योग्य रितीने वाढत असेल तर आईचे दूध बाळाला पुरत असल्याच लक्षण आहे. त्यामुळे आईने आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. 

सहा महिन्यांनंतर आहार कसा असावा?

१. बाळाला आहार सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

२. सहा महिन्यांनंतर वरचा आहार सुरू करण्याबरोबरच स्तनपान करा. प्रथम दिवसातून एकदा वरचा आहार द्यावा. नंतर त्याचे प्रमाण वाढवावे. 

३. मेडिकल किंवा दुकानांमध्ये मिळणारे तयार खाद्यपदार्थ बाळाला देऊ नयेत. ते अतिशय चवदार आणि अन्य घटकांनी युक्त असल्याने बाळाला चटपटीत खायची सवय लागते. 

४. तांदूळ आणि मूगडाळ यांची लापशी करावी. यात तीन भाग तांदूळ आणि एक भाग मूगडाळीत तूप आणि मीठ घालून दूध किंवा पाण्यात शिजवावे.

५. बाळाचे वय जसे वाढेल तसा आहार वाढवत न्यावा. रवा, नाचणीची खीर, मऊ भात, उकडलेला बटाटा, शिरा, उपीट द्यावे. 

६. बाळाला एका वेळी एकच पदार्थ द्यावा. त्याची सवय झाल्यानंतर दुसरा पदार्थ द्यावा. 

७. बाळाला घन पदार्थ खायची सवय करावी. गायी-म्हशीचे दूध, फळांचा रस, सूप, बेकरीचे पदार्थ टाळावेत. 

८. बाळाचे वजन वाढत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Back to top button