हाडांच्या बळकटीसाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश हवा | पुढारी

हाडांच्या बळकटीसाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश हवा

डॉ. संजय गायकवाड

आरोग्य चांगले राखण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच शरीरातील हाडांची देखभालही तेवढीच महत्त्वाची आहे. उत्तम आरोग्यासाठी बळकट हाडे आणि ती जोडणारे सांधे सक्षम असायला हवेत. या दोन्ही गोष्टी मजबूत ठेवायच्या असतील तर त्यासाठी आहार, व्यायाम इत्यादींचे अनेक मार्ग आहेत. ते समजावून घेतले तर आपल्यालाही सक्षम हाडे आणि त्यांचे सांधे लाभून उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.  

हाडांच्या सक्षमतेसाठी त्यांना मिळणारे कॅल्शियम अधिक महत्त्वाचे ठरते. त्यासाठी कॅल्शियम डी लाभेल असा आहार असायला हवा. ते मिळण्यासाठी दुग्धोत्पादने, मासे, थंड दूध इत्यादींचा आहारात समावेश करायला हवा. शेंगदाणे किंवा तत्सम पदार्थ हे हाडांना बळकटी देणारे चांगले खाद्य आहे. त्यापासून हाडांना कॅल्शियमची प्राप्ती होते. शेंगदाण्यांबरोबरच सूर्यफुलांचे बी, बदाम यापासूनही हाडांना कॅल्शियम लाभते. त्यामुळे त्याचाही आपल्या आहारात समावेश करायला हवा.

कॅल्शियम ‘डी’बरोबरच कॅल्शियम ‘के’ हेदेखील हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वाचे ठरते. यामुळे हाडांची रचनाही चांगली राहते. हाडांची क्षमता वाढण्यासही मदत होते. याखेरीज हिरव्या पालेभाज्यांचा आहारात भरपूर समावेश असायला हवा.

हाडांच्या सक्षमतेसाठी शारीरिकद़ृष्ट्या नेहमी कार्यरत असणे गरजेचे आहे. प्रौढांनी दिवसातून कमीत कमी अर्धा तास वजन उचलण्याचा व्यायाम करायला हवा. किशोरवयीनांनी तो एक तास करायला हरकत नाही. व्यायामात स्टेप अ‍ॅक्रोबिकऐवजी पोहणे, सायकलिंगसारखे व्यायाम करायला हवेत. बळकट स्नायूंमुळे सांधे सक्षम राहण्यास मदत होते. वजन उचलण्याचा व्यायाय स्नायू सक्षम ठेवण्यासाठी मदतीचा ठरतो.

व्यायाम करताना आपली उभे किंवा बसण्याची स्थिती (पोश्चर) योग्य असायला हवी. उभे राहताना नेहमी ताठ उभे राहायला हवे. यामुळे मानेपासून गुडघ्यापर्यंतच्या सांध्यांना होणार्‍या बाधा टाळण्यास मदत होते. हाडांच्या आरोग्यासाठी धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन टाळायला हवे; अन्यथा हाडे खिळखिळी होऊन ती तुटण्याची शक्यता वाढते.

हाडांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरची प्रामुख्याने अस्थिरोगतज्ज्ञांची भेट घेऊन त्यांना त्याविषयी सांगितले पाहिजे. कोणत्याही नवीन पदार्थांचा आहारात समावेश करायचा असेल तर तो करण्यापूर्वीही डॉक्टरांचा त्याविषयी सल्ला घ्यायला हवा. हाडांमध्ये वेदना होऊन वजन कमी झाल्यासारखे वाटत असेल तरी डॉक्टरांची भेट घ्यायला हवी. यामुळे भविष्यात होणारे आर्थ्रायटीससारखे आजार टाळण्यासाठी मदत होते.

गुडघे, कंबर, नितंब यांच्या हाडांना बाधा झाली असेल होणार्‍या वेदना नष्ट करण्यासाठी सर्जरीचा पर्याय उपलब्ध आहे. अशा सर्जरीनंतर रुग्ण नियमित जीवनशैली जगत आहेत. या शस्त्रक्रियांमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध झाले आहे.

बाजारात मिळणार्‍या सप्लिमेंटस्च्या आाधारे हाडांची बळकटी वाढवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आहारातून कॅल्शियम, लोह आणि अन्य जीवनसत्त्वे कशी शरीराला मिळतील, याकडे अधिक लक्ष द्या आणि व्यायामाला अंतर देऊ नका.

हेही वाचा 

Back to top button