landslides in Sahyadri: सह्याद्री पर्वतरांगेतील शेकडो गावे भूस्खलनाच्या छायेत !; पोखरणच भूस्खलनाला कारणीभूत | पुढारी

landslides in Sahyadri: सह्याद्री पर्वतरांगेतील शेकडो गावे भूस्खलनाच्या छायेत !; पोखरणच भूस्खलनाला कारणीभूत

कोल्हापूर: सुनील कदम: सह्याद्रीच्या द-याखो-यांमध्ये आणि डोंगर कड्यालगत वसलेली ९०० हून अधिक गावे वर्षानुवर्षे भूस्खलनाच्या छायेत आहेत. माळीण दुर्घटनेनंतर काही पर्यावरणवादी संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणात ते स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी दरवर्षी भूस्खलनाचे संकेत मिळतात पण गावकऱ्यांच्या बेफिकिरीमुळे कधीतरी माळीण, कधी तळीये तर कधी इर्शाळवाडीसारख्या घटना घडून जातात आणि सर्वांना खडबडून जाग येते; पण ती तेवढ्यापुरतीच. प्रामुख्याने ठिकठिकाणी सुरू असलेली सह्याद्रीच्या पठाराची पोखरण, भूकंप, वृक्षतोड आणि अतिवृष्टी या घटना भूस्खलनाला ( landslides in Sahyadri) हातभार लावताना दिसतात.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांचा बराचसा भूभाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. या दिसतात. पर्वतरांगांमधील दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि डोंगर कड्यालगत ९०० हून अधिक छोटी-मोठी गावे आणि वाड्या-वस्त्या कित्येक वर्षांपासून वसलेल्या आहेत. ही गावे आणि वाड्या-वस्त्यांना पूर्वी भूस्खलनाचा धोका नव्हता असे नाही; पण त्याचे प्रमाण अत्यल्प होते; पण कधी महामागोसाठी, कधी वेगवेगळ्या घ प्रकारच्या खाणींसाठी, नवीन नागरी वसाहतींसाठी व गे अन्य कारणांसाठी जसजशी सह्याद्रीची पोखरण सुरू झाली, तसतसा या भागात दरवर्षी भूस्खलनाचा धोका वाढत चाललेला दिसतो आहे. जोडीला जागतिक हवामानातील बदल, अफाट जंगलतोड, भूकंप अतिवृष्टी हे घटकही भूस्खलनाला ( landslides in Sahyadri) हातभार लावताना दिसतात.

साधारणतः ८० च्या दशकात ठिकठिकाणी आणि वेगवेगळ्या कारणांनी सह्याद्रीच्या पोखरणीला सुरुवात झाली आणि प्रामुख्याने त्यानंतरच भूस्खलनाच्या घटनेत वाढ (landslides in Sahyadri) होत गेलेली दिसते. १९८३ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५६ ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडून जवळपास २५ लोक मारले गेले. १९८९ मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात १२ ठिकाणी डोंगरकपारी कोसळल्या. त्यात भाजे या वि‍ गावातील ३८ व्यक्ती गाडल्या गेल्या. २००५ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात १७ ठिकाणी दरडी कोसळून कोडविते, दासगाव, रोहन आणि जुई येथे १९७ जणांचा मृत्यू झाला होता.

२०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात ९ ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्याचवर्षी भूस्खलनाच्या घटनेत माळीण हे अख्खे गावच्या गाव नामशेष झाले होते. २०२१ मध्ये या यादीत तळीये या गावाचे नाव जोडले गेले आणि त्यात जवळपास ९० लोकांचा बळी गेला. २०२१ मध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये अतिरेक वाढ झाली होती, त्याला कारण ठरले ते त्यावर्षी जुलै महिन्यात सह्याद्री पर्वतराजीमध्ये झालेला तुफानी पाऊस! महाबळेश्वर, कोयनानगर, नवजा या पाऊसप्रवण गावांसह संपूर्ण सह्याद्रीवरच त्यावर्षी तीन दिवसांत सरासरी ११०० ते १२०० मि.मी. पावसाची नोंद ( landslides in Sahyadri) झाली होती.

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर आणि ढोकावळे येथे भूस्खलनाच्या घटना घडून ३५ हून अधिक लोक ठार झाले. याचवर्षीत चिपळूण तालुक्यातील पेढे गावातील चार, खेड तालुक्यातील पोसरे गावातील सतरा लोक भूस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडले. या घटनांचा संबंध भूकंपाशी जोडला जातो आहे. महाराष्ट्राचा पृष्ठभाग हा कठीण खडकाचा असल्यामुळे इथे भूकंपाचा फारसा धोका नाही, असा पूर्वापार एक समज होता; मात्र १९६७ च्या भूकंपाने या समजालाच पहिला छेद दिला आणि महाराष्ट्रही भूकंपप्रवण ( landslides in Sahyadri) गणला जाऊ लागला.

१९६७ मध्ये झालेल्या भूकंपामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या भूभागाला तडे गेले होते, नेमक्या त्याच ठिकाणी १९८३ मध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यावरून भूकंपाचासुद्धा भूस्खलनामध्ये फार मोठा हातभार असल्याचे स्पष्टपणे जाणवते. सध्या सह्याद्री पर्वत रांगांमधील भूस्खलनाचा धोका असलेल्या ९०० पैकी अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांवर भूस्खलनाचे स्पष्ट संकेत दिसतात. कुठे डोंगराला भेगा पडल्या आहेत, कुठे जमीन हळूहळू खचताना दिसत आहे, कुठे पाण्याचे प्रवाह बदलताना, झाडेझुडपे कलताना दिसत आहेत. हे सगळे भविष्यातील भूस्खलनाचे स्पष्ट संकेत आहेत. वेळीच हे संकेत ओळखून सर्वच संबंधितांनी सावध होण्याची आवश्यकता आहे.

भूस्खलनाच्या या घटनांना निसर्गातील मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे. गेल्या चार-पाच दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. परिणामी, डोंगर पठारे रिकामी झाली. साहजिकच भूकंप, पाऊस व अन्य कारणांनी या डोंगररांगा कोसळणारच! वेगवेगळ्या कारणांसाठी कापाकापी झालेल्या डोंगररांगा या अफाट पावसामुळे भुईसपाट होताना दिसत आहेत. मुळातच जागतिक हवामानाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील सह्याद्रीकडे काळाच्या ओघात एवढेही दुर्लक्ष करायला नको होते. तसे दुर्लक्ष झाल्यामुळेच ठिकठिकाणी भूस्खलनासारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. – डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

 landslides in Sahyadri: स्पष्टपणे जाणवतात भूस्खलनाचे संकेत

भूस्खलनाचे दोन प्रकार असतात. वेगवान भूस्खलन व मंद भूस्खलन. वेगवान स्खलन हे काही क्षणात होते. या भूस्खलनाच्या मार्गात येणारा कोणताही अडथळा त्याला रोखू शकत नाही. याचे अनुमान करणे सहसा शक्य होत नाही. त्यामुळे तत्काळ कोणतीही उपाययोजना करणे शक्य नसते. मंद भूस्खलनाचे अनुमान काढणे शक्य असते. हे स्खलन मंदगतीने कित्येक दिवस चालू असते. उघड्या डोळ्यांना ते स्पष्ट दिसते. सह्याद्री पर्वतराजीत वसलेली अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात. डोंगराला भेगा गेल्या आहेत, डोंगर खचत आहेत, अतिवृष्टी दरम्यान घरातून पाण्याचे पाझर फुटत आहेत जमीन वारंवार हादरते, घरातील फरशा अलग होताना दिसतात, काही विहिरी अचानक भरून वाहू लागल्या आहेत, तर काही विहिरी आटल्या आहेत, अधूनमधून बोअरिंगमधून पाण्याचे कारंजे उडतात, घराला भेगा पडत आहेत, झाडे दिवसेंदिवस कलताना दिसत आहेत. असे अनुभव या भागातील गावे आणि वाड्या-वस्त्यांना येऊ लागले आहेत आणि हेच भूस्खलनाचे स्पष्ट संकेत आहेत.

हेही वाचा:

Back to top button