Maharashtra Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर | पुढारी

Maharashtra Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील १२ पर्यंतच्या शाळांना आज सुट्टी जाहिर केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आदेश दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २१ जुलैपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासोबतच जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीने, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीने, राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून आणि गर्दीमुळे आपत्कालीन परिस्थितीत त्याचा परिणाम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक (अंगणवाडी ते इयत्ता १२ वी) शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये. यासाठी आज दि. २० जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला. दरम्यान, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी हवामान खात्याचा राज्यात अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Back to top button