साळवण : पुढारी वृत्तसेवा : कुंभी धरण पाणलोट क्षेत्रासह गगनबावडा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊसाने नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कुंभी नदीवरील वेतवडे, मांडूकली, अणदूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मंगळवारीपासून (दि. १८) गेल्या चोवीस तासात सरासरी १८१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सलग तिसऱ्या दिवशी तालुक्यास मुसळधार पावसाने झोडपले. धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत आहे. कुंभी धरणामध्ये १.६१ टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे. कोदे व वेसरफ तलाव्यातून अनुक्रमे ११४४ व ३४५ क्युसेक इतका विसर्ग नदीपत्रामध्ये सुरु असल्याने कुंभी व सरस्वती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याचे पाटबंधारे विभाग शाखा अधिकारी अजिंक्य पाटील यांनी सांगितले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे.