Parenting Tips : पालकांनी जपून बोलावे, ‘या’ वाक्‍यांचा मुलांच्‍या मनावर होतो खोलवर परिणाम | पुढारी

Parenting Tips : पालकांनी जपून बोलावे, 'या' वाक्‍यांचा मुलांच्‍या मनावर होतो खोलवर परिणाम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पालक आणि मुलांमधील नातं हे संवादाच्‍या पायावरच उभे असते. आई-वडील आपल्‍या मुलांशी कसे बोलतात यावरच त्‍यांच्‍यामधील नातं घट्ट तरी होतं किंवा बिघडत तरी.  विशेषत: किशोरावस्‍थेतील मुलांशी संवाद साधताना पालकांनी विशेष काळजी घेण्‍याची गरज असते. ( Parenting Tips )  अलिकडेच झालेल्‍या एका संशोधनात दिसून आले आहे की, पालकांनी मुलांना चुकीचे शब्‍द वापरले तर मुलं अधिक आक्रमक होता. याचा त्‍यांच्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर परिणाम होतो.

काहीवेळा पालकांना त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिगत आयुष्‍यात नोकरी असो की व्‍यवसायात अनेक आव्‍हानांचा सामना करावा लागतो. अशावेळी नकळत त्‍यांची मुलांवर चीडचिड होते. त्‍यांच्‍याशी बोलताना विचार होत नाही. मात्र नेहमी लक्षात ठेवा तुम्‍हाला कितीही राग आला तरी मुलांसोबत बोलताना सतर्क रहा, अशी सूचना बाल मानसोपचार तज्‍ज्ञ करतात. जाणून घेवूया पालकांनी मुलांशी बोलताना कोणते शब्‍द टाळावेत याविषयी …

 Parenting Tips  शिवीगाळ करु नका

काही पालकांना राग आला तर ते मुलांना शिवीगाळ करतात. याचा मुलांच्‍या मनावर वाईट परिणाम होवू शकतो. त्‍यामुळे पालकांनी मुलांना कधीही शिवीगाळ करु नये. एकवेळ तुम्‍ही त्‍यांचीशी बोलला नाही तरी चालेल मात्र वाईट बोलून त्‍यांचे मन दुखावू नका, असा सल्‍ला मानसोपचार तज्‍ज्ञ देतात.

मुलांना ‘नाकर्ते’ म्‍हणू नका

मुलांना बर्‍याच शब्‍दांचा अर्थ माहित नसतो. त्‍यामुळे पालकांनी जर चुकीचा शब्‍द वापरला तर मुले या शब्‍दांचा अर्थ शोधतात. त्‍यामुळे मुलांना कधीच तू नालायक आहेस, तू काहीच करु शकणार नाही, असे शब्‍द प्रयोग करु नका. पालकांनी उच्‍चारलेला चुकीचा शब्‍द हा मुलांचा आत्‍मविश्‍वास कमी करताेच त्‍याचबराेबर त्‍याचा पालकांवरील विश्‍वासही कमी हाेताे.

तुम्‍ही आमच्‍यावरील ओझे आहात…

पालकांना मुलांना वाढवितांना अनेक आव्‍हानांना तोंड द्‍यावे लागते. यातूनच तणाव निर्माण होतो. कधीकधी विविध समस्‍यांमुळे अगतिक झालेले पालक मुलांना वाटेल तसे बोलतात. पालकांना राग आला की, तो मुलांवर काढला जातो. यातून मुलांना ‘तुम्‍ही आमच्‍यावरील ओझे आहात’, असे म्‍हटले जाते. मात्र याचा खोलवर परिणाम मुलांवर होतो. तो पालकांपासून दुरावला जातो. पुढे काही वर्षांनंतर तुमची मुलं नेहमी याच वाक्‍याची तुम्‍हाला आठवण करुन देत तम्‍हाला दोष देतात.

तुझं तोंड पाहण्‍याची इच्‍छा नाही

चिडलेले पालक मुलांना नळकत काहीही बोलतात. तुझं तोंड पाहण्‍याचीही इच्‍छा नाही, असेही पालक म्‍हणतात. मात्र या
वाक्‍यामुळे मुलांच्‍या मनात असुरक्षित भावना तयार होते. त्‍यामुळे पालकांनी कधीही टोकाचा संवाद साधू नये. पाहुण्‍यांसमोर किंवा रस्‍त्‍यावर मुलांना अपमानकारक बोलू नये.  दुसर्‍या मुलांबरोबर तुलना करुन त्‍यांना अपमानित करणे ही त्‍यांच्‍या मनावर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरते.

घरातून बाहेर काढेन

काही पालक हे मुलांना नेहमी चांगले वागण्‍याची सूचना देत असतात. तसेच काही खोड्या केल्‍या तर घरातून बाहेर काढेन, असेही सुनावत असतात. मात्र मुले सुधारण्‍यासाठी दिलेली सूचनाच घातक ठरते. यामुलांना कधीच घरातून बाहेर काढेन असे म्‍हणू नका, या वाक्‍यामुळे पालक आणि मुलांमध्‍ये मोठी दरी निर्माण होते. अशी वाक्‍य मुलांच्‍या जिव्‍हारी लागतात. त्‍याच्‍या मानसिकतेवर दुष्‍परिणाम हाेताे.

चुकीच्‍या बोलण्‍याचे मुलांवर होणारे परिणाम

पालकांनी मुलांशी बोलताना चुकीचे शब्‍दाचा वापर केल्‍यास. मुले नकारात्‍मक विचार करु लागतात. तसेच आक्रमकही होतात. त्‍यांच्‍या मनात निर्माण झालेल्‍या अस्वस्थतेमधून अविचारी कृती होण्‍याचाही धोका असतो. मुले एकतर खूप आक्रमक होतात किंवा त्‍यांना सतत भीतीच्‍या छायेत राहतात, असेही नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

मुलांचे पालनपोषण ही एक मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना खूप गोष्‍टींचे भान ठेवावे लागते. पालक मुलांशी कसा संवाद साधतात यावर त्‍यांची भविष्‍यातील वाटचाल ठरते. मुलांशी योग्‍य संवाद साधत त्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढवा. तुमचे चुकीचे शब्‍द मुलांच्‍या मनातील असुरक्षितता वाढवतात. त्‍याचबरोबर त्‍यांच्‍यावर मनावर याचा खोल परिणाम होतो याचे पालकांनी सतत भान ठेवणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button