Mental Health : ३० मिनिटे सोशल मीडियापासून लांब राहत व्‍यायाम केल्‍यास हाेतात ‘हे’ फायदे, जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

Mental Health : ३० मिनिटे सोशल मीडियापासून लांब राहत व्‍यायाम केल्‍यास हाेतात 'हे' फायदे, जाणून घ्‍या सविस्‍तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आलं आणि गेली दोन वर्ष जगण्‍यातल्‍या अनेक गोष्‍टींमध्‍ये बदल झाला. कोरोना महासंकटाचा मुकाबला करण्‍यासाठी सामाजिक जीवनात अनेक निर्बंध आले. आपल्‍यासाठी सारं काही नवं होतं. याच काळात मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर वाढला. आता कोरोनाच्‍या संकटातून सारं जग बाहेर पडत आहे. मात्र सोशल मीडियाच्‍या अतिवापरामुळे सामाजिक आणि मानिसिक समस्‍या निर्माण होत आहेत. मानसिक स्‍वास्‍थ हवे असेल तर  दररोज ३० मिनिटे सोशल मीडियापासून लांब राहत ताेच वेळ व्‍यायामाला द्‍यावा, असा निष्‍कर्ष जर्मनीतील रुहर विद्यापीठामध्‍ये झालेल्‍या संशोधनात नोंदविण्‍यात आला आहे. जाणून घेवूया या संशोधनातील निष्‍कर्ष…

कोरोना काळात लॉकडाउनमुळे अनेक जण घरात अडकले. एकाकीपणा, चिंता आणि निराशेची भावना कमी करण्‍यासाठी लोक फेसबुक, टिकटॉक, ट्विटर आणि सोशल मीडियाच्‍या अन्‍य प्‍लॅटफॉर्मकडे वळाले. त्‍यांचा दिवसभरातील सर्वाधिक वेळ मोबाईल स्क्रीनवर जावू लागला. आता कोरोनाचे संकट कमी झाले तरीही सोशल मीडियाच्‍या अतिवापराच्‍या सवयीमुळे मानसिक समस्‍या निर्माण झाल्‍याचे निदर्शनास येत आहे.

Mental Health : सोशल मीडियापासून काहीकाळ लांब राहण्‍यावर संशोधन

रुहरा विद्‍यापीठातील मेंटल हेल्थ रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटरच्या सहाय्यक प्रोफेसर ज्युलिया ब्रेलोस्व्हस्काया यांच्‍या
नेतृत्‍वाखाली टीमने संशोधन केले. संशोधनाचा विषय होता, सोशल मीडियाचा वापर कमी करणे आणि शारीरिक हालचाली वाढवणे. तसेच सोशल मीडियाचा वापर आणि तंबाखू सेवनामध्‍ये झालेली वाढ याचा परिणाम यावरही संशोधन करण्‍यात आले.

६४२ जणांनी नोंदवला संशोधनात सहभाग

या संशोधनात ६४२ प्रौढ व्‍यक्‍तींनी सहभाग नोंदवला. यामध्‍ये चार गट करण्‍यात आले. सोशल मीडिया गटामध्‍ये १६२
व्‍यक्‍तींचा समावेश होता. तर शारीरिक हालचाली करणारे १६१ , दोन्‍ही क्रिया करणारे १५९ जण आणि नियंत्रण गटात १६० जणांचा समावेश होता. दोन आठवड्यांपेक्षा जास्‍त दोन गटांनी सोशल मीडियाचा वापर ३० मिनिटांनी कमी केला तर दोन गटाने दैनंदिन व्‍यायाम ३० मिनिटांनी वाढवला होता.

संशोधनातील निष्‍कर्ष

सोशल मीडियापासून ३० मिनिटे दूर राहिल्‍याने आणि हा वेळ शारीरिक हालचालींना दिलेल्‍यांच्‍या मानसिकतेमध्‍ये मोठा सकारात्‍मक बदल झाल्‍याचे निदर्शनास आले. तीन मिनिटांच्‍या शारीरिक हालचली आणि सोशल मीडियापासून लांब राहिण्‍यामुळे मनातील नकारात्‍मक परिणाम कमी झाला. तसेच तंबाखूजन्य पदार्थांचा वापर कमी झाल्‍याचा निष्‍कर्ष सहाय्यक प्रोफेसर ज्युलिया ब्रेलोस्व्हस्काया यांच्‍या टीमने नोंदवला आहे.

या संशोधनावर ‘मेडिकल न्‍यूज टुडे’ने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शेल्डन झाब्लो यांच्‍याशी चर्चा केली. त्‍यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा अतिवापराचा सर्वाच वयोगटातील मानसिक आरोग्‍यावर नकारात्‍मक परिणाम होतो. यामुळे मानसिक आरोग्‍याच्‍या समस्‍यांमध्‍ये वाढ होते. प्रोविडेन्स सेंट जॉन्स हेल्थ सेंटरचे संचालक डॉ मेरिल यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा अतिवापर हा मानिसक आरोग्‍यावर परिणाम होतोच त्‍याचबरोबर व्‍यसनाधीनता वाढण्‍यासही ते कारणीभूत ठरु शकते.

Mental Health : व्‍यायामाचा मेंदूवर होता सकारात्‍मक परिणाम

व्‍यायामाचा मेंदूला होणार्‍या फायद्‍याबाबत डॉ. झाब्लो यांनी सांगितले की, सर्वच वयोगटात व्‍यायाम हा अत्‍यावश्‍यकच ठरतो. नियमित व्‍यायामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्‍य सुधारते. व्‍यायामामुळे मानवी मेंदूतील नैसर्गिक निराशा आणि चिंताविरोधी न्‍यूरोट्रांसमीटर वाढतात. त्‍यामुळे याचा सकारात्‍मक परिणाम मानसिक आरोग्‍यावर होतो. तर सोशल मीडियाच्‍या अतिवापरामुळे मेदूमध्‍ये हे न्‍यूरोट्रांसमीटर कमी होऊ शकतात.

हेही वाचा 

Back to top button