सीमाप्रश्न : ६५ वर्षांपासून ‘या’ गावात दिवाळीची आरतीच झाली नाही! (video) | पुढारी

सीमाप्रश्न : ६५ वर्षांपासून 'या' गावात दिवाळीची आरतीच झाली नाही! (video)

खानापूर (बेळगाव) : वासुदेव चौगुले

दिवाळी म्हणजे उत्साहाला आलेले उधाण. पणत्या आणि आकाश कंदिलांचा झगमगाट. अन् शुभेच्छांची देवाण घेवाण. पण या सर्व आनंदाला मुरड घालून मंगलमय समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या आरतीलाही फाटा देणारे खानापूर तालुक्यात एक गाव आहे. त्याचे नाव जळगे. हो, एक दोन नव्हे तर तब्बल 65 वर्षांपासून या गावात दिवाळीची आरती झाली नाही. कारण आहे 65 वर्षापुर्वी संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत नाही तोपर्यंत कोणीही दिवाळीची आरती करून घेणार नाही. ही पूर्वजांची प्रतिज्ञा. आजही जळगे गावची तिसरी पिढी ही आरतीला फाटा देण्याची परंपरा जिवापाड जपत आहे. दिवाळीची आरती होईल तर ती महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यावरच. या आशेने निकालाकडे डोळे लावून आपल्या निर्धारावर ते ठाम आहेत.

आजही खानापूर तालुक्यात अशी अनेक गावे आहेत जिथे सीमाप्रश्न यासाठी सर्वस्व त्याग करण्याची भावना बाळगणारे कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये जळगे गावचे नाव आवर्जून घ्यावे लागते. गेल्या 65 वर्षांत पासून येथे एकाही घरात दिवाळीची आरती झालेली नाही. जोपर्यंत सीमा प्रश्नाची सोडवणूक होत नाही आणि आपले गाव महाराष्ट्रात सामील होत नाही तोपर्यंत दिवाळीची आरती करून घेणार नाही असा पूर्वजांनी प्रतिज्ञा केली होती. आजची तरुण पिढीही तीच निष्ठा आणि त्याच अभिमानाने पुढे नेत आहे.

दिवाळीत घरोघरी दिसणारे आम्रपर्णाचे तोरण नाही. सजवलेले अंगण नाही. इतकेच काय तर शुभ आणि मंगलमय समजली जाणारी दिवाळीची आरतीही नाही. हा अचंबित वाटणारा निर्धार जळगेवासियांनी प्राणपणाने जपला आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मराठीबहूल सीमाभाग कर्नाटकच्या दावणीला बांधण्यात आला. त्यावेळी झालेल्या पहिल्या सीमाप्रश्न आंदोलनात जळगे येथून अनेकांनी सहभाग घेतला. त्यावेळी अवघे 18 वर्षे वय असलेले आणि आज वयाची 85 वर्षे गाठलेले नारायण रामचंद्र लाड यांनी गावातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभाग घेतला होता.

सीमालढ्यासाठी झालेल्या सर्व आंदोलनात जळगे ग्रामस्थ अग्रभागी राहिले आहेत. पहिल्या आंदोलनात घरटी किमान एक जण सहभागी होत असे. सत्याग्रहाला जाताना घरातून आरती करून पाठवण्याची प्रथा होती. जळगे येथून अनेजण आरती करून घेऊन सत्याग्रहाला रवाना झाले. शांततेच्या मार्गाने सुरु असलेला सत्याग्रह पोलीस बळाचा वापर करून दडपून टाकताना अनेक सत्याग्रहींना तुरुंगात टाकण्यात आले. चार ते सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगून गावातील पहिल्या फळीतील कार्यकर्ते जेव्हा घरी परत आले. तेव्हा चळवळीतील त्यांचा जोश आणखी वाढला होता. दिवाळीचा तो काळ होता. सीमाप्रश्न चळवळीसाठी काय योगदान देता येईल याबाबत ग्रामस्थांची बैठक झाली. महाराष्ट्र राज्यात सामील होऊन संयुक्त महाराष्ट्राचा सूर्योदय जोपर्यंत बघत नाही. तोपर्यंत कोणीही दिवाळीची आरती व औक्षण करून घेणार नाही. असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तो पिढ्यानपिढ्या प्रामाणिकपणे पाळला जात आहे. या निर्णयाची कोणावर सक्ती नाही पण पूर्वजांनी केलेला ‘पण’ भीष्मप्रतिज्ञा समजून स्वयंस्फूर्तीने तिचे पालन केले जात आहे.

या गावातील गणपतराव पाटील, भैरू पाटील, शिवणगेकर मामा यासारख्या अनेकांनी अनेक महिन्यांचा तुरुंगवास भोगल्याने चळवळीची दाहकता आम्ही कधीही विसरणार नाही असा निर्धार मल्हारी तोपिनकट्टी, गंगाराम निलजकर, मुकुंद देवराईकर, विनायक गुरव, नारायण पाटील, परशराम गुरव या तरुणांनी बोलून दाखवला.

सीमाप्रश्न : अन् त्यांचे डोळे पाणावले

पहिल्या सत्याग्रहात सहभागी झालेले नारायण लाड याबाबत सांगताना म्हणाले, सत्याग्रहींमध्ये तरुणांचाही मोठा सहभाग होता. तरुणांना जर बेळगाव येथील जेलमध्ये ठेवले तर स्थानिक असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी तरुण सत्याग्रहींना धुळे, साबरमती, पुणे यासारख्या लांबच्या तुरुंगात डांबण्यात आले. साडे चार महिन्याचा तुरुंगवास भोगला. खस्ता खाल्ल्या. पण निर्धार ढळला नाही. आजही तो कायम असल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

फेटा, धोतर झाली आंदोलनकर्त्यांची ओळख

आंदोलनात सहभागी होताना काळी टोपी आणि पायजमा घातलेल्या तरुणांना उत्साही आणि आवेशपूर्ण बनवण्यासाठी समितीचे तत्कालीन नेते एल बी बिरजे गुरुजी यांनी फेटा आणि धोतर बांधण्याची सूचना केली. त्यावेळेस फेटा आणि धोतर हे आंदोलनकर्त्यांची जणू ओळखच बनली होती. धोतर आणि फेटाधारी नारायण मामा यांना पाहिल्यानंतर ती आजही कायम असल्याचे दिसून येते.

अन् तुरुंग अपुरे पडले!

सीमा सत्याग्रही कैद्यांमुळे जेल अपुरे पडले. त्यामुळे रस्ते आणि वाटा नसलेल्या ठिकाणी अनेक कैद्यांना दुर्गम जंगलात सोडून देण्यात आले. साराबंदी लढ्यात गावात कधीही रात्री-अपरात्री पोलीस येऊन भाताची पोती आणि तट्टे फोडून सारा वसूल करत होते. काही क्रूर पोलिस अधिकारी तर गोठ्यातील जनावरांच्या गोधणीच्या जागेत सत्याग्रही लपले असतील असे समजून बूट घालून गोधन तुडवत असतं. तरीही कणखर निर्धारापुढे त्या यातना काहीच वाटले नाहीत असे उद्गार नारायण लाड यांनी काढले.

हे ही वाचा :
पहा व्हिडिओ : बेळगाव : ना दिवाळीची आरती, ना पेटती पणती! सीमाप्रश्न सोडवणुकीच्या ध्यासापोटी जळगेवासियांचा ६५ वर्षांपासून दिवाळी आरतीला फाटा…

Back to top button