

टी २० वर्ल्डकप २०२१ च्या (T20 World Cup) सेमीफायनलमध्ये जाण्याचा भारताच्या आशा उंचावल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या सामन्यात (India vs Scotland) भारताने स्कॉटलंडला ८ विकेटस्नी हरवले. भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. स्कॉटलंडचा संघ अवघ्या ८५ धावांवर ऑल आउट झाला. त्यानंतर केवळ ६.३ षटकांत २ गडी गमावून भारताने हे लक्ष्य सहज पार केले. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कोहलीने या विजयानंतर बोलताना बोलताना म्हटले की, आम्हाला अशीच कामगिरी करायची आहे. आता आमचे लक्ष ७ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे आहे.
(T20 World Cup) आम्हाला माहीत आहे आम्ही काय करु शकतो. मैदानावर टॉस जिंकणे किती महत्वाचे असते हे आम्हाला कळाले. यापुढेही येथील मैदानावर टॉस जिंकणे महत्वाचे ठरु शकते. पहिल्यांदा फलंदाजी करणे आणि नंतर फलंदाजी करणे यात खूप फरक आहे, असे विराटने म्हटले. आम्ही जेव्हा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही ठरविले होते की स्कॉटलंडला ११०-१२० धावांवर रोखू. पण आम्ही आखलेल्या रणनितीनुसार चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलने दमदार खेळी केली. आम्हाला वाटत होते की ८ ते १० षटकांत आम्ही लक्ष्य पार करु. पण आम्हाला माहित होते की नैसर्गिकरित्या खेळ केला तर धावा जमतील. सराव सामन्यात आम्ही अशीच फलंदाजी केली. तशी फलंदाजी स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात केली आणि कमी षटकांत लक्ष्य पार केले, असे विराटने नमूद केले.
काल शुक्रवारी विराटचा ३३ वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर विराटला विचारण्यात आले की तू तुझा वाढदिवस कसा साजरा करणार?. त्यावर तो म्हणाला, आता ती वेळ निघून गेली आहे. माझे कुटुंब इथेच आहे. अनुष्का आणि वामिका यांचे इथेच असणे हे माझ्यासाठी मोठे गिफ्ट आहे. अशा कठीण परिस्थितीत माझे कुटुंब सोबत असणे माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे विराटने सांगितले.