बेळगाव : जि.पं., ता.पं. आरक्षण एप्रिलपूर्वी; राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र | पुढारी

बेळगाव : जि.पं., ता.पं. आरक्षण एप्रिलपूर्वी; राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या मतदारसंघाची पुनर्रचना जाहीर केल्यानंतर आता इतर मागासवर्ग आरक्षणदेखील एक एप्रिलपूर्वी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानच जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीचेही बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यावर उच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले असून गतवर्षी डिसेंबर महिन्यात सरकारला पाच लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे राज्य सरकारला जाग आली असून मतदारसंघांची पुनर्रचना जाहीर केली आहे. आता एप्रिलपूर्वीच मतदारसंघनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकाही येत्या मे, जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांचे वारे सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत आचारसंहिला लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गरम झाले आहे. अशातच जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांतही तयारी सरकारने सुरू आहे. त्यामुळे आगामी काळ हा निवडणुकांचा असणार आहे.

Back to top button