बेळगाव-दुबई थेट विमानसेवा देणार : संजय घोडावत | पुढारी

बेळगाव-दुबई थेट विमानसेवा देणार : संजय घोडावत

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : स्टार एअरच्या ताफ्यात लवकरच पाच विमानांचा समावेश होणार असून, बेळगावहून दुबईला थेट आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरु करणार आहे, अशी माहिती स्टार एअर आणि घोडावत उद्योग समुहाचे प्रमुख संजय घोडावत यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

संजय घोडावत रविवारी (दि.७) रोजी सायंकाळी गोगटे कॉमर्स कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी  ‘पुढारी’ शी बोलताना घोडावत म्हणाले की, स्टार एअरकडून लवकरच बेळगावहून पाच ठिकाणी कनेक्टीव्हीटी सुरु करण्यात येत आहे. आमच्या ताफ्यात येत्या दोन महिन्यांत पाच विमानांचा समावेश होणार आहे. ही विमाने अत्याधुनिक स्वरुपाची असणार आहेत. त्यानंतर आम्ही बेळगावहून सकाळ सत्रात बंगळूरसाठी विमानसेवा सुरु करणार आहोत. त्याचबरोबर म्हैसूर, शिमोगा शहरासाठी सेवा सुरु करण्यात येत आहे.

बेळगावचे विमानतळ हे येत्या दीड वर्षात आंतराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय स्तरावर चर्चाही सुरु आहे. आंतराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही बेळगाव ते दुबई अशी थेट विमानसेवा सुरु करणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या मागणीनुसार, आम्ही बेळ्ळूर, धारवाड येथे खाद्य तेलाचा प्रकल्प उभारणार आहे. यामध्ये ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यामध्ये रोज तीनशे टन तेलाचे उत्पादन करणार आहे. रोज सोयाबीनचे पाचशे टन गाळप करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

पत्रकारांना २० टक्के विमानप्रवासात सूट

स्टार एअरच्यावतीने अधीस्विकृती (अ‍ॅक्रीडेशन) कार्ड प्राप्त पत्रकारांना विमानप्रवासात २० टक्के सूट देण्यात आली आहे. याचा लाभ पत्रकारांनी घ्यावा ,असे आवाहनही संजय घोडावत यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button