वाघळवाडीत सांडपाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

वाघळवाडीत सांडपाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षभरापासून गावात करोडो रुपयांची विकासकामे केल्याचा दावा करणार्‍या वाघळवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतअंतर्गत येणार्‍या दुकान लाइनच्या पाठीमागील गटर पाइपलाइन झाली नसल्याने सांडपाण्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा आणि डुकरांचा उपद्रव वाढल्यामुळे येथील ग्रामस्थांना डेंग्यूने ग्रासले आहे. शौचालय दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

मात्र, सांडपाणी जाण्यासाठी पाइपलाइन करण्याची गरज आहे. अशीच परिस्थिती कन्नडवस्ती येथील ग्रामस्थांची असून, हा भाग अनेक कारणांनी विकासापासून दूर आहे. सोमेश्वर कारखान्याशेजारील रस्त्यालगत विविध प्रकारची दुकाने आहेत. जवळपास पन्नास वर्षांपासून या ठिकाणी ग्रामस्थ आपला व्यवसाय सांभाळत याच ठिकाणी राहत आहेत. दुकान लाइनच्या पाठीमागे शौचालय आणि सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था केली नसल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील सांडपाणी वाहून जाण्यासाठी पाइपलाइन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button