पुणे : खेडमध्ये इच्छुकांचा हिरमोड | पुढारी

पुणे : खेडमध्ये इच्छुकांचा हिरमोड

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या रचना करून वाढविलेले गट व गण सध्याच्या एकनाथ शिंदे व भाजप युतीच्या सरकारने रद्द केल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी वर्षभरापासून तयारी केलेल्यांचा अक्षरशः हिरमोड झाला आहे. खेड तालुक्यात वाढलेले जिल्हा परिषदेचे दोन गट व चार गण कमी होणार आहेत. नक्की दोन गट कमी होणार का, एक गट कमी होणार, याबाबत संभ्रमावस्था आहे.

खेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट व पंचायत समितीचे 14 गण आहेत. परंतु, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गट व गणांची नवीन रचना केल्याने दोन गट आणि चार गण वाढले होते. दोन गट वाढल्याने जुन्या गटातील गावे नवीन गटात समाविष्ट केल्याने जुन्या गटाचे अक्षरशः तुकडे झाले. वाढलेल्या आणि जुन्या गटात निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु, सध्याच्या युती सरकारने वाढविलेली गटांची रचना रद्द केल्याने गट अनुकूल असलेल्यांच्या आनंदावर विरजण पडले, तर ज्यांना गट अनुकूल नव्हते अशांना आनंद झाला.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गावागावांत जाऊन अनेक कार्यक्रम घेऊन मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. यासाठी लाखो रुपये खर्चही केले आहेत. सध्या गट व गणांची नव्याने रचना व आरक्षण देखील नव्याने पडणार असल्याने ‘कहीं खुशी कहीं गम’ अशीच स्थिती इच्छुकांची झाली आहे. खेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील, रूपाली कड, अतुल देशमुख, निर्मला पानसरे, बाबाजी काळे, तनुजा घनवट, दीपाली काळे असून, यांना पुन्हा होणार्‍या गट आरक्षणात संधी मिळणार का नाही? आणि नाही मिळाली, तर आपल्या घरातील व्यक्तीला उभे करणार का आणि किती जण निवडणुकीला सामोरे जाणार, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button