बेळगाव : शेकडो वर्षांपासून काकतीत घुमतोय सिद्धेश्‍वरांचा जयघोष | पुढारी

बेळगाव : शेकडो वर्षांपासून काकतीत घुमतोय सिद्धेश्‍वरांचा जयघोष

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  श्रावण महिना म्हणजे सणासुदीची लगबग..धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल..सणासणीचा उत्साह..मंदिरातून घुमणारा घंटानाद…सकाळ, संध्याकाळ ऐकू येणार्‍या आरती, भजन, कीर्तनांचा सुकाळ. सर्वत्र आनंदाची उधळण..सणावाराचा उत्साह. बेळगाव तालुका मंदिरांनी समृद्ध आहे. वेगवेगळ्या गावात पुरातन मंदिरे अनेक वर्षांपासून भाविकांना अभय देत उभी आहेत. तेथील भाविकांची त्यांच्यावर असीम अशी श्रद्धा आहे. सिद्धेश्‍वर, कलमेश्‍वर, घळगेश्‍वर, रामलिंगेश्‍वर, वैजनाथ यासारखी वेगवेगळी मंदिरे ग्रामदैवते ठरली आहेत. प्रत्येक गावातील मंदिरांचा आजपासून आम्ही श्रावण मासी, हर्ष मंदिरी या मालिकेतून रोज वेध घेणार आहोत. याची सुरुवात काकती येथील सिद्धेश्‍वर मंदिरापासून आम्ही करत आहोत.

श्रावण महिना म्हणजे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, अध्यात्मिक आणि प्रसन्‍न वातावरण. अशा या महिन्याची नुकताच सुरूवात झाली असून शहर परिसरातील शिवमंदिरे सजली आहे. यापैकी एक म्हणजे काकती येथील सिद्धेश्‍वर मंदिर. काकती हे गाव जसे राणी चन्‍नम्मा यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. तसेच ते सिद्धेश्‍वर मंदिरामुळे असंख्य भाविकांच्या जवळचे आहे.

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काकतीत सिद्धेश्‍वर मंदिर वसले आहे. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. शेकडो वर्षांपूर्वी देसाई संस्थान काळात या मंदिराचा म्हणजेच तत्कालीन पिंडीचा शोध लागला. देसाई कुटुंबीयांच्या गाई या परिसरात चारण्यास सोडण्यात येत असत. कायम चांगल्या प्रमाणात दूध देणारी त्यापैकी एक गाय काही दिवसांपासून दूध कमी देत होती. त्यामुळे देसाई संस्थानाच्या प्रमुखाने गुराख्याला गाईकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. गुराख्याने गायीवर लक्ष ठेवले होते. सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी त्यावेळी जंगल भाग होता. काही जणांच्या मते या भागात स्मशान होते. ही गाय निवडूंग असलेल्या काटेरी झुडपे असलेल्या ठिकाणी थांबून पान्हा सोडत असल्याचे त्याने पाहिले. ही बाब त्याने देसाई यांना सांगितली. देसाई यांनी दुसर्‍या ठिकाणी त्या ठिकाणाचा शोध घेतला असताना तेथे शिवलिंग आढळले. त्यांनी परिसर स्वच्छ केला. परिसरात पुन्हा वीरभद्र, गणेश, बनशंकरी आणि नागमूर्ती सापडल्या. शिवलिंगासाठी दगड आणि मातीने मंदिर उभारण्यात आले. त्यामुळे हे शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते. याशिवाय हुनसेवारी या परिसरात असलेल्या रेवणसिद्धय्या मंदिराशीही संबंध असल्याचे सांगितले जाते.

मंदिर जीर्णोध्दार
ग्रामस्थांच्या पुढाकाराने सिद्धेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. 1978 ते 1980 या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर पंच मंडळीच्या देखरेखेखाली मंदिराचे कार्यक्रम करण्यात येत आहेत.
सिद्धेश्‍वर मंदिरात श्रावणात लघु रूद्राभिषेक करण्यात येतात. श्रावणातील तिसर्‍या सोमवारी महाप्रसाद असतो. तर गुढी पाडव्यानंतरच्या कृतिका नश्रत्रावर यात्रा भरते.

मंदिर असे
सिद्धेश्‍वर मंदिराचा आकार मोठा आहे. मुख्य गाभार्‍यात शिवलिंग आहे. समोर दोन नंदी आहे. मंदिरात विविध देवता आणि राष्ट्रपुरूषांची सुबक चित्रे रंगवली आहेत. पालखी आहे. मंदिराच्या चारही बाजूला नागदेवता, गणेश, वीरभद्रेश्‍वर आणि बनशंकरी यांची लहान मंदिरे आहेत. मंदिर परिसरातील वातावरण शांत आणि प्रसन्‍न असते.

सामाजिक कार्य
सिद्धेश्‍वर मंदिरातर्फे वर्षभर सामाजिक कार्य करण्यात येते. सुमारे चार एकर जागेच्या आवारात दोन मंगल कार्यालये आहेत. त्यापैकी एक कार्यालय नव्याने उभारण्यात आले असून त्याचा आकार 8,748 चौ. फू. इतका आहे. परिसरात इतके मोठे मंगल कार्यालय नाही. सवलतीच्या दरात हे कार्यालय देण्यात येते. याशिवाय इतर सामाजिक कार्यातही मंदिराच्या पंच मंडळींकडून मदत करण्यात येते.

देवस्थान पंच मंडळ
सिद्धेश्‍वर देवस्थान पंच मंडळातर्फे वर्षभर अनेक उपक्रम हाती घेण्यात येतात. सध्या सिद्धाप्पा गाडेकर हे मंडळाचे अध्यक्ष असून 101 जणांचे पंच मंडळ कार्यरत आहे.

Back to top button