बेळगाव : खानापूर आरोग्य विभागालाही मराठीचा विसर | पुढारी

बेळगाव : खानापूर आरोग्य विभागालाही मराठीचा विसर

खानापूर;  पुढारी वृत्तसेवा :  खानापूर तहसीलदार कार्यालयात मराठीला डावलण्याचा प्रकार घडल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या तालुका सरकारी दवाखान्यालाही मराठीची कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या नामफलकावर मराठीला डावलून केवळ एकाच भाषेला स्थान देण्यात आल्याने मराठी भाषिक नागरिकांची गैरसोय होत आहे.

सरकारी दवाखान्याच्या अंतर्गत भागाचे नूतनीकरण केले जात आहे. माता आणि शिशु इस्पितळाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. मोफत उपचारांमुळे मोठ्या संख्येने रुग्ण सरकारी दवाखान्यावर अवलंबून राहतात. त्यामुळे किमान दवाखान्यासारख्या अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी भाषाभेद बाजूला ठेवून समान वागणूक अपेक्षित असते. पण सरकारी दवाखान्याच्या दर्शनी बाजूवर बसवण्यात आलेल्या नाम फलकावरुन मराठीला सोयीस्कररित्या वगळण्यात आल्याने मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नुकताच तहसीलदार कार्यालयाच्या नामफलकाचे नूतनीकरण करताना केवळ कन्नड फलकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मराठी फलकाला जैसे थे ठेवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आरोग्य विभागालाही मराठीचा विसर पडल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.
काही महिन्यांपूर्वी मराठीतून दिले गेलेले अर्ज स्वीकारणार नसल्याचा फतवा एका तालुकास्तरीय अधिकार्‍याने काढला होता. अनेक सरकारी कार्यालयात नियमानुसार कन्नड बरोबर मराठीतून माहिती देण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. तथापि आरोग्य विभागाने मराठीलाही स्थान द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजली जाते. सरकारी दवाखान्यावर गोरगरीब जनता अवलंबून असते. शासकीय सेवांमध्ये मराठीला डावलण्यात आल्याने तालुक्यातील 70 टक्के मराठी भाषिक जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
रमेश धबाले, माजी अध्यक्ष, ग्रा. पं. चापगाव

Back to top button