Bengaluru | बंगळूरमधील ३ हॉटेल्सना बॉम्बची धमकी, तपास सुरु | पुढारी

Bengaluru | बंगळूरमधील ३ हॉटेल्सना बॉम्बची धमकी, तपास सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूर शहरातील द ओटेरासह ३ नामांकित हॉटेलांना बॉम्बची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला आहे. यानंतर बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक द ओटेरा हॉटेलमध्ये पोहोचले, अशी माहिती दक्षिण पूर्व बंगळूरचे डीसीपी यांनी दिली आहे.

पहाटे २ च्या सुमारास बॉम्बची धमकी देणारे ईमेल्स हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. याची माहिती त्यांच्याकडून तत्काळ पोलिसांना देण्यात आली. यानंतर ओटेरा हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून बॉम्बशोधक पथक परिसराची कसून तपासणी करत आहेत.

१४ मे रोजी बंगळूरच्या वेगवेगळ्या भागांतील किमान आठ शाळांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. पण नंतर ही अफवा निघाली. तसेच एप्रिलच्या सुरुवातीला दिल्ली-एनसीआर, जयपूर, उत्तर प्रदेश आणि बंगळूरमधील अनेक शाळांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. ज्यामुळे दहशत निर्माण झाली होती. या सर्व धमक्या नंतर फसव्या ठरल्या होत्या.

दिल्लीतही बॉम्बची अफवा

दरम्यान, दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला आल्यामुळे बुधवारी एकच खळबळ उडाली होती. पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी गृहमंत्रालयाच्या इमारतीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, कुठेही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला दुपारी ३ च्या सुमारास हा धमकीचा ईमेल आला होता. दिल्लीतील द्वारका परिसरातही बॉम्बची अफवा होती.

हे ही वाचा :

Back to top button