कर्नाटक : जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही : बोम्मई | पुढारी

कर्नाटक : जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही : बोम्मई

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत सध्या तरी शासनापुढे कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले. बेळगाव जिल्हा महाराष्ट्रालगत असल्यामुळे विभाजनाबाबत पुढे कर्नाटकच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री बेळगावला आले असता विश्रामगृहात पत्रकारांनी त्यांची भेट घेतले असता ते बोलत होते. मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शुक्रवारी आपण पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्‍लीला जात असून, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्यामध्ये बेळगाव जिल्हा सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. याच्या विभाजनासाठी मागणी वाढली आहे, असे असलेरी सध्यातरी शासनापुढे बेळगाव जिल्ह्याचे विभाजन किंवा त्रिभाजनाचा कोणताही प्रस्ताव नाही. जिल्ह्याच्या विभाजनाबाबत जे. एच. पटेल मुख्यमंत्री असल्यापासून चर्चा सुरु आहे. यासंदर्भात बेळगावसह कर्नाटकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेतला जाईल. आयटी पार्कसाठी सध्या संरक्षण खात्याकडे असलेली आठशे एकर जमीन पुन्हा कर्नाटक सरकारकडे मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. ही जमीन प्रत्यक्षात लष्कराच्या नावावर नाही. ही जमीन महसूल खात्याची आहेत. यासंदर्भात आपण संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली असून, या जागेचा ताबा लवकरच राज्य शासनाला मिळेल.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी आपण शुक्रवारी दिल्‍लीला जात आहे. यावेळी सरन्यायाधीशांबरोबर मुख्यमंत्र्यांची परिषद होत आहे. या परिषदेनंतर आपण पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असून, यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येईल. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, सी. सी. पाटील आदी उपस्थित होते.

चर्चा करून विमानतळाला नाव

येथील सांबरा विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून, यासंदर्भात विचारता मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, सर्व स्थानिक नेतेमंडळी याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. त्यानंतर त्याच्या नावाचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात येईल.

हेही वाचलत का ?

Back to top button