हिंदी राष्ट्रभाषेवरून वादंग, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली कन्नड अभिनेत्यांची बाजू | पुढारी

हिंदी राष्ट्रभाषेवरून वादंग, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली कन्नड अभिनेत्यांची बाजू

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

कन्नड अभिनेते सुदीप यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या विधानानंतर अभिनेते अजय देवगण यांनी त्यांना हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्याचे सांगितले होते. त्यावर कर्नाटकातील काही अभिनेत्यांनी ट्विट करून विरोध दर्शवला आहे, तर मुख्यमंत्र्यांसह काही नेत्यांनी सुदीप यांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले.

सुदीप यांनी हिंदीबाबत वादग्रस्त विधान केले होते. ‘केजीएफ 2’च्या यशानंतर सुदीप यांनी कन्नड भाषेतील चित्रपट दर्जेदार असल्याचे विधान केले. आज बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनवले जातात. त्याचे डबिंग तेलगू, तमिळ आदी भाषांमध्ये होते; पण त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. त्या तुलनेत कन्नड चित्रपटांचा दर्जा चांगला असून, उत्तर भारतातही कन्नड चित्रपट चांगली कमाई करत असल्याचे ते म्हणाले होते.

अजय देवगणने सुदीप यांच्या विधानावर आक्षेप घेतला. हिंदी ही आपली मातृभाषा असून, राष्ट्रीय भाषा आहे. ही राष्ट्रीय भाषा नाही तर इतर चित्रपट हिंदीमध्ये डब का केले जातात? असा प्रश्‍न ट्विटद्वारे विचारला. यावरून हिंदी-कन्नड भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अभिनेते सुदीप यांचे म्हणणे योग्य असल्याचे म्हटले. सुदीप यांनी कन्नड ही आपली मातृभाषा असल्याचे सांगितले. प्रादेशिक भाषा म्हणून कन्नडचा प्रत्येकाने अभिमान बाळगावा; पण हिंदी ही राष्ट्रीय भाषा नसल्याचे बोम्मई यांनी सांगितले.

दरम्यान, भाषांतर करताना चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. गैरसमज होऊ शकतो. सर्वांनी सर्व भाषांचा आदर करणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण अजय देवगण यांनी दिले. त्यांना त्याच पद्धतीने प्रतिसाद देताना सुदीप यांनी कोणताही विषय पूर्ण जाणूनच त्याबाबत विधान केलेले बरे असे सांगून या वादावर पडदा पाडल्याचे संकेत दिले.

केंद्रामध्ये आलेल्या सरकारकडून दरवेळी प्रादेशिक भाषांना डावलण्यात आले. केवळ हिंदी भाषेला महत्त्व देण्यात आले. काँग्रेसने सर्वप्रथम हे सुरु केले. भाजपही आता त्याच मार्गावर जात आहे. – एच. डी. कुमारस्वामी (पक्षश्रेष्ठी, निजद)

हिंदी ही राष्ट्रभाषा असूच शकत नाही. प्रत्येक भारतीयाने प्रत्येक भाषेचा आदर करावा. प्रत्येक भाषेला वेगळा इतिहास आहे. सर्वांनी त्याबद्दल अभिमान बाळगावा. – सिद्धरामय्या (विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यामध्ये कन्नड ही मातृभाषा आहे. तर देशामध्ये हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे. प्रत्येकाने सर्व भाषांचा आदर करावा.
– मुरुगेश निराणी (उद्योगमंत्री, कर्नाटक)

Back to top button