क्रीडा स्पर्धा सहभागासाठी जन्मदाखला अनिवार्य, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा निर्णय | पुढारी

क्रीडा स्पर्धा सहभागासाठी जन्मदाखला अनिवार्य, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकविध खेळांच्या संघटना पुरस्कृत विविध क्रीडा स्पर्धांतील सहभागासाठी खेळाडूंंना वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले असून, ते राज्य संघटनांना पाठविण्यात आले आहे. या निर्णयाचे स्वागत खेळाडूंसह प्रशिक्षक आणि पालकांकडून होत आहे. आगामी काळात गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकविध खेळांच्या राज्य संघटनांद्वारे विविध वयोगटांच्या जिल्हा तसेच राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंना पात्रतेनुसार राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. काही खेळांमध्ये अधिक वयाचे खेळाडू वय कमी करून कमी वयोगटात सहभागी होत असल्याच्या तक्रारी संचालनालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा शाळांमध्ये केली असता, कागदपत्रांमध्ये फेरफार करून वय कमी केल्याचे आढळले होते.

वय लपविण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार हे क्रीडा विकासासाठी मारक आहे. त्या पार्श्वभूमीवर गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी एकविध खेळांच्या संघटना पुरस्कृत विविध स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंचे वय निश्चित करण्यासाठी ही कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली आहेत. त्यानुसार खेळाडूंचा एक वर्षाचा असताना शासकीय विभागाने दिलेला जन्मदाखला, पाच वर्षांपर्यंत असताना शासकीय विभागाने दिलेला जन्मदाखला तसेच पाच वर्षांनंतर जन्मदाखल्यासह पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत गृहीत धरली जाणार आहे.

दरम्यान, वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखल्यासह आधारकार्ड अथवा पासपोर्ट अनिवार्य करण्यात आले आहे. संबंधिक कागदपत्रे नसल्यास त्या खेळाडूंना त्या वयोगटासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच कागदपत्रांसंदर्भात स्पर्धाविषयक परिपत्रकांमधून माहिती देण्याची सुचना आयुक्त बकोरिया यांनी दिले आहेत.

दरवर्षी वय लपवून खेळाडू सहभागी होत असतात. मात्र, त्यावर कोणतेही नियंत्रण नव्हते. आता वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला अनिवार्य करण्यात आल्याने गैरप्रकारांना आळा बसेल. खेळाडू वय लपवू शकणार नाही. तसेच पात्र खेळाडूंना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
– राजेश बागूल, जिल्हा क्रीडा अधिकारी (नाशिक)

हेही वाचा :

Back to top button