निपाणी : पावसाचा जोर राहिल्यास उद्याच महामार्गावर पाणी येण्याची शक्यता! | पुढारी

निपाणी : पावसाचा जोर राहिल्यास उद्याच महामार्गावर पाणी येण्याची शक्यता!

निपाणी पुढारी वृत्तसेवा : निपाणी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी एका रात्रीत निपाणी तालुक्यात 327 मिलिमीटर इतक्या पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे प्रशासन अलर्टवर आहे.

दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. असाच जोर राहिल्यास शुक्रवार सायंकाळपर्यंत सौंदलगा ते निपाणी या टापूत काही काळासाठी सखल भागामध्ये महामार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे.

निपाणी पाऊस
पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली

हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान संभाव्य महापुराचा धोका ओळखून तहसील प्रशासनाने नदीकाठावरील नागरी वस्तीच्या स्थलांतरास गंजी केंद्र स्थापन करण्याची तयारी चालवली आहे.

निपाणी तालुक्यातील चिकोत्रा, वेदगंगा, दूधगंगा या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठावरील अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच तालुक्यातील कारदगा – भोज, जत्राट – भिवशी, कुन्नर – भोजवाडी, सिदनाळ अकोळ, हे ४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु झाली आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहील्यास जेडकिहाळ – शिरदवाडा, सदलगा – बोरगांव हे बंधारेसुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

निपाणी-इचलकरजी मार्गावरील लखनापूर पुलावरील ओढ्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. निपाणी परिसरासह नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी सायंकाळपासून धुवाधार पाऊस सुरू आहे.

निपाणी पाऊस
महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आलेले पाणी.

तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली

बुधवारी सायंकाळी जत्राट – भिवशी व भाजवाडी – कुनाह दोन बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यानंतर बुधवारी व गुरुवारी पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानंतर नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होवून तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

मुसळधार पावसामुळे निपाणी तालुक्यातील नदी काठावरील गावामध्ये निर्माण होणारी सभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

तालुक्यात तहसील प्रशासनाच्यावतीने एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच परिस्थिती ओळखून जनावरासह नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

नदी काठावरील नागरिकांना सतर्क रहावे

परिस्थिती पाहुन गंजी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती तहसिलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली. हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरीकांना सतर्क रहावे लागणार आहे.

दरम्यान गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने तहसील प्रशासनाने पोलिस प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

निपाणी पोलीस सर्कलच्या वतीने ग्रामीण भागात बीट पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने माहिती मिळवून देण्याचे काम चालवले आहे. विषय करून प्रशासनाने कोडणी, बुदिहाळ, यमगरणी,भिवशी, जत्राट, सिदनाळ, हुनरगी यासह आदी नदीकाठावरील गावावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

Back to top button