धुवाँधार! पावसाचा पॅटर्न बदलला आहे का?

 धुवाँधार पावसाने महाबळेश्वर - पाचगणी रस्त्यावर पाणी आल्याने या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. (छाया : प्रेषित गांधी)
धुवाँधार पावसाने महाबळेश्वर - पाचगणी रस्त्यावर पाणी आल्याने या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. (छाया : प्रेषित गांधी)

पुढारी ऑनलाईन डेस्क; राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. विशेषतः घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. जुलैच्या मध्यावधीपर्यंत पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु झाला. आणि आता राज्यातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे.

अलीकडच्या काही वर्षांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचे दिवस कमी झालेत. तर अतिवृष्टी होण्याचे दिवस वाढलेत. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. हा बदल केवळ भारतातच नाही तर जगभरात दिसून येत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत विस्तारला आहे. यामुळे कोकणसह घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.

तर आता २३ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. ही स्थिती पुढील चार दिवस राहू शकते. याच्या प्रभावाने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

आता सध्या कोकण आणि घाटमाथा क्षेत्रात पडत असलेल्या पावसाबाबत हवामान विभागाने पूर्वसूचना दिली होती. पुढील दोन-तीन दिवस या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहणार आहे.

दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो. यंदा जून महिन्यात मुसळधार ते अतिवृष्टी असा पाऊस पडला. त्यानंतर जुलैच्या मध्यावधीपर्यंत पावसाने उसंत दिली. त्यानंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली आणि आता घाटमाथ्यासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

यंदा मान्सूनचा पाऊस चांगला…

यंदा मान्सूनचा पाऊस चांगला राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामानात तीव्र बदल होत आहेत. त्याचा परिणाम मान्सूनवर होत असल्याचेही हवामान विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यंदा मान्सूनचा पाऊस सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा किंचित जास्त राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

चक्रीवादळांचा मान्सूनवर प्रभाव…

यंदा मान्सून पूर्व काळात 'तोक्ते' व 'यास' ही दोन चक्रीवादळे अनुक्रमे अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात निर्माण झाली. गेल्या वर्षी अ‍ॅम्फन, निसर्ग तर मान्सुनोत्तर काळात 'गती', 'निवर' आणि 'बुरेवी' अशा एकंदर पाच चक्रीवादळे येऊन गेली. चक्रीवादळांचा मान्सूनवर प्रभाव पडतो; पण मान्सून काळात चक्रीवादळे निर्माण होत नाहीत हे महत्त्वाचे आहे.

कमी दाबाचा पट्टा म्हणजे नेमके काय?

जमिनीवरील काही भाग गरम असतो. काही ठिकाणी थंड असतो. गरम ठिकाणी असलेली हवा हलकी होऊन वर सरकते. त्याची जागा थंड हवा घेते. ही प्रक्रिया वेगाने सुरुवात होते. त्यामुळेच समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर : सह्याद्रीतील अनोख्या हिरव्या बेडकाची गोष्ट 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news