‘कॉफी’ : सिद्धार्थ, स्पृहा आणि कश्यपचा रोमँटिक अंदाज शुक्रवारी भेटीला | पुढारी

‘कॉफी’ : सिद्धार्थ, स्पृहा आणि कश्यपचा रोमँटिक अंदाज शुक्रवारी भेटीला

पुढारी ऑनलाईन

‘कॉफी’ म्हटलं की वाफाळता कप, मोहित करणारा सुंगध आणि रोमँटिक डेट हे ओघाने येतंच. प्रेमाचे वेगवेगळे अनुभव प्रत्येकजण घेत असतो. अशाच काहीशा कडू-गोड प्रेमाच्या अनुभवांची लज्जतदार कॉफी १४ जानेवारीला चित्रपटगृहात चाखायला मिळणार आहे. ‘तन्वी’ फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘कॉफी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले असून कैलास सोरारी आणि विमला सोरारी या चित्रपटाचे निर्माते आहेत.

मानवी आयुष्य हे सतत अनिश्चिततेच्या झुल्यावर झुलत असतं. पुढच्या वळणावर काय घडेल? कोण भेटेल? याचे अंदाज आपण बांधू शकत नाही. कधीकधी तर हा योगायोग संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी देतो. द्विधा मनःस्थिती व्हावी, असे अनेक प्रसंग प्रेमात येतात. प्रेमातील चढ़उतारांचा व कडू गोड आठवणींचा हा प्रवास दाखवताना रणजित, रोहित, रेणु या तिघांच्या आयुष्याची कथा चित्रपटात पहायला मिळणार आहे. काही कारणामुळे उद्भवलेला आयुष्याचा गुंता हे तिघं कशाप्रकारे हाताळणार? याची मनस्पर्शी कथा म्हणजे हा चित्रपट. यात सिद्धार्थचा चुलबुला तर कश्यपचा गंभीर, समजूतदार अंदाज दिसणार आहे. अल्लड तरीही ठाम भूमिकेत स्पृहाच्या व्यक्तिरेखेचा वेगळा रंग दिसणार आहे.

गोव्यातील अनेक नयनरम्य स्थळांवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ‘वेगवेगळी वळण घेत चित्रपटाची कथा रंगणार आहे. प्रेक्षकांसाठी ही रोमँटिक ट्रीट असणार आहे.

प्रत्येकाच्या ओठावर रुळतील अशी चार मधुर गाणी या चित्रपटात आहेत. त्यातील एक ‘कॉफी’ चे टायटल सॉंग आहे. रोहित राऊतने हे गाणं गायलं आहे. कविता राम आणि प्रसन्नजीत कोसंबी यांच्या आवाजातील ‘जाहला जीव हा’ हे रोमँटिक गीत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातली ‘उरीच्या वेदनेला’ ही दोन्ही गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. ‘श्वासात मोगऱ्याच्या’ या गीताला सुरेश वाडकर यांचा स्वरसाज लाभला आहे.

चित्रपटाची कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांची आहे. संवाद मच्छिंद्र बुगडे आणि नितीन कांबळे यांनी लिहिले आहेत. संकलन राहुल भातणकर यांनी केले आहे. छायांकन आय गिरिधरन यांनी केले आहे. गीते अशोक बागवे, नितीन कांबळे यांनी लिहिली आहेत. संगीत तृप्ती चव्हाण यांचे आहे. कलादिग्दर्शन हरीश आईर यांचे आहे. कार्यकारी निर्माते संजय कांबळे आहेत. सिद्धार्थ, स्पृहा आणि कश्यपच्या रोमँटिक अंदाजातील लज्जतदार ‘cofee’ येत्या शुक्रवारी १४ जानेवारीला चित्रपटगृहांत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

Back to top button