मॅच सुरू असतानाच क्रिकेटरच्या छातीत कळ, मैदानातून थेट रुग्णालयात दाखल | पुढारी

मॅच सुरू असतानाच क्रिकेटरच्या छातीत कळ, मैदानातून थेट रुग्णालयात दाखल

लाहोर; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचा कसोटी सलामीवीर आबिद अली (abid ali) याला प्रथम श्रेणी टूर्नामेंट कायदे-ए-आझम ट्रॉफी सामन्यादरम्यान छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आबिदने दोनदा छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर संघ व्यवस्थापक अश्रफ अली आणि वैद्यकीय पथकाने यांनी मैदनात धाव घेतली. त्यानंतर अबिदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले.

हा सामना मध्य पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा यांच्यात यूबीएल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कराची येथे खेळला जात होता. आबिदला फलंदाजी करताना दोनदा छातीत कळ आली. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर तो ६१ धावांवर नाबाद होता. आबिद अलीच्या अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तथापि, हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे वेदना झाल्या आहेत की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. आबिद अली कायदे-ए-आझम करंडक स्पर्धेत मध्य पंजाबचे प्रतिनिधित्व करत आहे.

abid ali

माजी कसोटी विकेटकीपर फलंदाज अश्रफ अली म्हणाला, ‘अबिद ६१ धावांवर खेळत होता. तेव्हा त्याने दोनदा छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर आम्ही तत्काळ याची दखल घेत मैदानात वैद्यकीय पथकाला बोलावले. त्यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून छातीच्या दुखण्याविषयी विविध चाचण्या केल्या जात आहेत. सध्या काही सांगता येणार नाही, तपासणी अहवालानंतरच खरी परिस्थिती समोर येईल.

आबिद अलीने २००७ मध्ये कायदे-ए-आझम ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ६,००० हून अधिक धावा केल्या आहेत. २०१७/१८ मध्ये इस्लामाबादकडून फलंदाजी करताना त्याने २३१ धावा केल्या होत्या. त्याच्या वनडे पदार्पणानंतर लगेचच त्याने नाबाद २४९ धावा केल्या. वयाच्या ३१ व्या वर्षी त्याने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करणारा आबिद अलीकडेच बांगलादेशच्या यशस्वी कसोटी दौर्‍यानंतर मध्य पंजाब संघात सामील झाला. पाकिस्तानच्या देशांतर्गत स्तरावर तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४९ च्या सरासरीने ११८० धावा केल्या आहेत. नाबाद २१५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

आबिद अली २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने यावर्षी कसोटीत १५ डावात जवळपास ५० च्या सरासरीने ६९५ धावा केल्या आहेत. आबिद अलीने २०२१ मध्ये २ शतके आणि २ अर्धशतकेही झळकावली आहेत.

Yasir Shah : पाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटरची बलात्कारी मित्राला मदत!, गुन्हा दाखल

Back to top button