पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातील वाद अजून संपलेला नाही, तोच नवा वाद सुरू झाला आहे. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (R. Ashwin) माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shatri) यांच्या एका जुन्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०१९ मधील ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान शास्त्री यांनी कुलदीप यादवचे एक नंबर फिरकी गोलंदाज म्हणून वर्णन केले होते. त्यांच्या याच विधानावरून अश्विनने शास्त्री गुरुजींवर निशाणा साधला आहे. (Ashwin vs Ravi Shastri)
भारताचा स्टार फिरकीपटू अश्विन हा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक आहे. जेव्हा कसोटी क्रिकेटचा विचार केला जातो तेव्हा त्याचे रेकॉर्ड अतुलनीय आहे. त्याने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर विधान केले आहे. या विधानानंतर भारतीय क्रिकेट जगतात एकच खळबळ माजली आहे. (Ashwin vs Ravi Shastri)
मुलाखतीत अश्विनला विचारण्यात आले की, २०१९ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत पाच बळी घेतल्यानंतर प्रशिक्षक शास्त्री यांनी कुलदीप यादवला परदेशातील भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज म्हणून नेमले तेव्हा त्याला कसे वाटले. यावर अश्विन म्हणाला की, मी कुलदीपच्या कौतुकासाठी मी आनंदी आहे. कारण त्याला माहित आहे की ऑस्ट्रेलियामध्ये फिरकी गोलंदाज म्हणून पाच विकेट घेणे किती कठीण आहे. परंतु शास्त्रीच्या त्या विधानाने मी पूर्णपणे निराश झालो. शास्त्रींनी विदेशी खेळपट्टीवरील नंबर एकचा फिरकीपटू म्हणून कुलदीपचा उल्लेख केल्याने मला वाईट वाटले, मी दुखावलो. (Ashwin vs Ravi Shastri)
अश्विन (R. Ashwin) म्हणाला की, २०१९ च्या दौ-यावेळी माझ्याकडे दुर्लक्ष केले गेले. तेव्हा असे वाटले की, मला वाईटरित्या डावलण्यात आले आहे. कुणीतरी बसखाली फेकले आहे. अशा परिस्थितीत मी स्वतःला संघापासून अलिप्त समजायला लागलो. मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. माझ्या कारकिर्दीतील तो इतका वाईट काळ होता की निराशेमुळे माझ्या मनात कधी-कधी निवृत्तीचा विचारही येत असे. (Ashwin vs Ravi Shastri)
२०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसाने प्रभावित झाला होता. अशा स्थितीत सिडनी कसोटीदरम्यान, कुलदीप यादवने उत्कृष्ट कामगिरी केली आणि यजमानांविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या. हा सामना अनिर्णित राहिला. पण भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली. या विजयानंतर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते की कुलदीप आता त्यांचा सर्वोत्तम विदेशी फिरकी गोलंदाज आहे.' यासोबतच अश्विनच्या दुखापती आणि फिटनेसचा संदर्भ देत ते म्हणाले की, 'प्रत्येकाकडे वेळ असतो'. (Ashwin vs Ravi Shastri)
अश्विन पुढे म्हणतो की, मी रवी शास्त्रींचा खूप आदर करतो. आम्ही सर्वजण हे करतो. माझा विश्वास आहे की, आपण काही गोष्टी बोलतो आणि नंतर त्या मागे घेतो, परंतु त्या एका क्षणात मी स्वतःला पूर्णपणे तुटलेले पाहिले. कुलदीपसाठी मी आनंदी होतो. मी एका डावात ५ विकेट घेऊ शकलो नाही, पण कुलदीप यादव मिळवू शकला. मला माहित आहे की ते किती मोठे यश होते, असे त्यांने व्यक्त केले. (Ashwin vs Ravi Shastri)
ऑस्ट्रेलियात जिंकणेही तितकेच आनंदाचे होते, पण परदेशी भूमीवर मी चांगली कामगिरी करू शकत नाही, असे मला वाटू लागले. जर मी एकटा राहिलो तर मी संघाच्या किंवा सहकाऱ्याच्या सक्सेस पार्टीचा आनंद कसा घेऊ शकेन? मी माझ्या खोलीत गेलो आणि पत्नीशी बोललो, माझी मुलेही तिथे होती. मी नैराश्य बाजूला ठेववण्यास सक्षम होतो. त्यानंतर टीम इंडियाच्या विजयी पार्टीला मी हजेरी लावली. अखेर आम्ही एक मोठी मालिका जिंकली होती, त्याचा आनंद मोठा होता, असेही अश्विनने म्हटले.
त्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा संदर्भ देताना अश्विनने सांगितले की, मी खूप वेदनेमध्ये खेळत होतो. दोन्ही डावांत प्रत्येकी तीन बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीनंतरही शास्त्रींची कुलदीपवरील टिप्पणी माझ्यासाठी निराशाजनक होती. पहिली कसोटी अजूनही माझ्या स्मरणात आहे. आम्ही पहिल्या डावात कमी धावसंख्येवर सर्वबाद झालो. त्यानंतर मी गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चारपैकी तीन विकेट घेतल्या. आणि नंतर चौथ्या डावात जेव्हा खेळपट्टी पूर्णपणे सपाट होती, तेव्हा गंभीर दुखापतीनंतरही मी ५० पेक्षा जास्त षटके टाकली आणि तीन बळी घेतले.'