पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आणि यावेळी चर्चेत येण्याचे कारण अतिशय लाजिरवाणे आहे (pakistan cricketer rape case). पाकिस्तान क्रिकेट संघाचा लेगस्पिनर यासिर शाहवर (Yasir Shah) एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि बलात्कार प्रकरणात आपल्या मित्राला मदत केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी यासिर शाह (Yasir Shah) आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सध्या तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि इतर कोणत्याही क्रिकेटपटूकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
यासिर शाह (Yasir Shah) हा पाकिस्तानी कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत 46 कसोटी सामने खेळले असून 31.09 च्या सरासरीने 235 बळी घेतले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एका शतकाची नोंद आहे.
एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, यासिरच्या मित्राने आधी बंदुकीचा धाक दाखवून अल्पवलीन मुलीचे अपहरण केले. आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यासोबतच व्हिडिओ बनवून धमकीही दिली. या सर्व प्रकारात यासिरने मदत केल्याचे पीडितेने सांगितले आहे. एफआयआरनुसार, जेव्हा पीडितेने यासिरकडे मदत मागितली तेव्हा तो हसायला लागला आणि म्हणाला की मला तरुण मुली आवडतात. पीडितेने पोलिसांत तक्रार केली असता, यासीरने हे सर्व करू नये म्हणून पैसे आणि फ्लॅटचे आमिष दाखवले.
इस्लामाबाद पोलिसांनी यासिरविरुद्धच्या एफआयआरला दुजोरा दिला आहे. पीडित अल्पवयीन मुलीची लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाईल, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. यासीर फोनवर तोंड बंद ठेवण्याची धमकी देत असे आणि मित्र फरहानशी लग्न करण्यासही सांगत असे, असे पीडित मुलीने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
यासिर शाहबद्दल (Yasir Shah) बोलायचे झाले तर तो सध्या दुखापतीमुळे पाकिस्तान संघातून बाहेर आहे. यासिरने कसोटी सामन्यात सर्वात जलद २०० बळी घेतले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमवरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. एका महिलेने बाबरवर १० वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तसेच त्याने मला धमकीही दिल्याचे पीडित महिलेने म्हटले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, बाबरने तिला लग्नाचे खोटे आश्वासन दिले होते. त्यातून शरीरसंबध आल्याने मी गरोदरही राहिली होते. यानंतर बाबरने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या माहितीनुसार, बाबर आणि ती एकाच शाळेत शिकायला होते. तसेच दोघेही एकाच वस्तीत राहत होते.