R. Ashwin : आर. अश्विन याने निवृत्तीचा निर्णय घेतला, कारण... | पुढारी

R. Ashwin : आर. अश्विन याने निवृत्तीचा निर्णय घेतला, कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा ३५ वर्षीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (R. Ashwin) याने टीम इंडियासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये मायदेशातील आणि विदेशातील मैदानावर नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे. या स्टार फिरकीपटूने आतापर्यंत ४२७ कसोटी विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळे आणि कपिल देव यांच्यानंतर रेड-बॉल फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तो देशातील तिसरा गोलंदाज बनला आहे. अश्विनच्या बॅटने धावांचीही कमाई केली आहे. त्याने आपल्या संयमी खेळीच्या जोरावर मागिल वर्षी ऑस्ट्रेलियात कसोटी वाचवली होती.

पण भारताच्या या स्टार फिरकीपटूने २०१८ ते २०२० दरम्यान अनेकदा निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. त्याला वाटत होते की दुखापतींमुळे तो पुन्हा मैदानात उतरू शकणार नाही. तसेच त्यावेळी त्याला लोकांचाही पाठिंबा मिळत नव्हता. अश्विनने मंगळवारी क्रिकेटविषय वाहिनीशी मुलाखतीदरम्यान याबाबत खुलासा केला. अश्विन सध्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. अश्विनने (R. Ashwin) पुढे म्हटले आहे की, २०१७ ते २०१९ दरम्यान त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला चालणे कठीण झाले होते आणि वेदनांमुळे त्याने निवृत्तीचा विचारही केला होता. एक क्रिकेटर म्हणून त्याच्यासाठी हा सर्वात कठीण काळ होता, असेही त्याने व्यक्त केले.

कसोटी क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम करत असलेला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (R. Ashwin) अनेक धक्कादायक खुलासे केले. अश्विनने सांगितले की, मध्यंतरी एक वेळ होती जेव्हा तो ५-६ चेंडू टाकायचा आणि त्याला दम लागायचा. पण आता तो यातून सावरला आहे. २०१८ आणि २०२० दरम्यान, मी खेळ सोडण्याचा विचार केला होता. दुखापतीचा मला खूप त्रास व्हायचा, मी सहा चेंडू टाकायचो तेव्हाही दम लागायचा. मी केलेली मेहनत फळाला येत नव्हती, अशी खंत त्याने बोलून दाखवली.

अश्विनने २०१८ मधील इंग्लंड मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा गंभीरपणे विचार केला होता. कारण संघासाठी चमकदार कामगिरी करूनही त्याला साथ दिली जात नसल्याचे त्याला वाटत होते. तो म्हणाला की ३ वर्षांपूर्वी एक वेळ होती, जेव्हा ६ चेंडू टाकल्यावर थकवा जाणवायचा. अश्विनने सांगितले की, त्याने गोलंदाजीचे तंत्र बदलले, त्यानंतर त्याला चांगले यश मिळू लागले. गेल्या काही वर्षांत अश्विनने केवळ चेंडूनेच टीम इंडियासाठी कसोटी जिंकली नाही, तर अनेक प्रसंगी त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाचा पराभव टाळला आहे.

आर अश्विनने मुलाखतीत सांगितले की, २०१८ आणि २०२० दरम्यान, मी अनेक गोष्टींचा विचार करून खेळ सोडण्याचा गंभीरपणे विचार करू लागलो. मला वाटले की मी खूप प्रयत्न केले आहेत, पण हवा तसा परिणाम येत नव्हता. मी जितका प्रयत्न केला तितक्या गोष्टी माझ्यापासून दूर होताना दिसत होत्या. मग मला ६ चेंडू टाकल्यावरच दम लागायचा आणि मला श्वास घेण्यासाठी थांबावे लागायचे. मला वेदना असह्य होत होत्या, असे त्याने सांगितले.

रविचंद्रन अश्विनसाठी २०२१ हे वर्ष खूप चांगले गेले. या वर्षात त्याने फक्त ८ सामन्यात ५२ विकेट घेतल्या. तर याच वर्षी अश्विनने कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंग, वसीम अक्रम यांचा विक्रमही मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांच्या यादीत आर. अश्विन (R. Ashwin) आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अश्विनच्या नावावर ८१ सामन्यात ४२७ विकेट्स आहेत. त्याच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आणि कपिल देव आहेत.

Back to top button