Parvovirus : पायरो व्हायरसचे संकट, अमरावतीत रोज शंभरावर श्वानांवर उपचार! | पुढारी

Parvovirus : पायरो व्हायरसचे संकट, अमरावतीत रोज शंभरावर श्वानांवर उपचार!

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

अमरावती, नागपूर, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाळीव व मोकाट श्वानांवर पायरो व्हायरस (Parvovirus) आजाराचे संकट आले आहे. अमरावती शहरात दररोज शंभरावर श्वानांवर उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रेबीज आणि पायरो व्हायरसचे लसीकरण करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्येही लागण झाली आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत. त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही.

अमरावती शहरातील जिल्हा पशू चिकित्सालयात पायरो (Parvovirus) व्हायरसची लागण झालेले श्वान व शेळीवर उपचार केले जात आहेत. आठ ते दहा दिवस सलाइनने उपचार केले जातात. दररोज शंभरपेक्षा अधिक कुत्री गेल्या चार ते पाच आठवड्यांपासून उपचाराकरीता आणली जात आहेत.

गावठी आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याची लागण होऊ नये, यासाठी रेबीज आणि पायरो व्हायरसची लस देणे गरजेचे आहे. पण, त्याची 750 रुपयांपेक्षा अधिक किंमत असल्याने पशुपालकदेखील त्यांच्याकडील कुत्री, बकऱ्यांना ही लस टोचून घेत नाहीत. याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर पंचगंगा नदीवर दिसला गवा…. | Gaur

Back to top button