‘बीड’च्या Monkey Vs Dog चा ट्विटरवर ट्रेंड का सुरू आहे ? मीम्स व्हायरल | पुढारी

'बीड'च्या Monkey Vs Dog चा ट्विटरवर ट्रेंड का सुरू आहे ? मीम्स व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवार १८ डिसेंबरपासून ट्विटरवर #MonkeyVsDog ट्रेंड सुरु आहे. अनेक युजर्संनी अनेक फनी मीम्स शेअर केले आहेत. हा ट्रेंड महाराष्ट्रातील बीड मधील घटनेमुळे सुरु झाला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

माजलगाव तालुक्यातील लवूळ येथे मागच्या एक महिन्यापासून वानरांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरातील कुत्र्यांची पिल्ले उचलून नेत वानरे त्यांना झाड व इमारतीवरून खाली फेकून देतात. महिनाभरात अनेक कुत्र्यांची पिल्ले या वानरांनी मारून टाकली आहेत. काही ग्रामस्थांवर देखील वानरांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्‍त होत आहे. #MonkeyVsDog

लवूळ परिसरात महिनाभरापूर्वी कुत्र्यांनी वानराचे एक पिल्लू मारल्याचा प्रकार घडला होता. तेव्हापासून वानर कुत्र्यांची पिल्ले शोधून त्यांना उचलून नेत आहेत. उचलून नेलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना ते उंचावरून फेकून देतात. उंचावरून फेकल्यामुळे आजपर्यत दोनशेपेक्षा जास्त कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही व्यक्‍तींवर देखील वानरांनी हल्ला केला आहे.

#MonkeyVsDog : गावातील कुत्र्यांची संख्या कमी

पंधरा दिवसांपूर्वी सीताराम नायबळ यांच्या कुत्र्याच्या पिलाला वानराने उचलून घराच्या गच्चीवर नेले. यावेळी नायबळ पिल्लाला सोडवण्यासाठी गच्चीवर गेले असता वानराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पळून जात असताना नायबळ गच्चीवरून खाली पडले. यात त्यांचा पाय मोडला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

गावातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याने आता वानरं माणसांवर आणि लहान मुलांवर देखील हल्ला करत आहेत. एका लहान मुलाला वानराने उचलून गच्चीवर नेले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने काठ्या व दगड घेऊन गेल्याने त्या बालकाची सुटका झाली. वानराच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून वन विभागाकडे तक्रार करूनदेखील त्यांनी वानरांना पकडले नाही. यामुळे ग्रामस्थांमधून मोठा संताप व्यक्‍त होत आहेे. #MonkeyVsDog

वानराचे पिल्लू मारल्यानंतर सुरू झाले सूड सत्र…

लवूळ परिसरात कुत्र्यांनी वानराचे एक पिल्लू मारल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. या घटनेनंतर वानरांनी कुत्र्याचे पिल्ले शोधून त्यांना मारण्याचे सत्र सुरू केल्याचे ग्रामस्थांचे म्हणण आहे. मागील एक महिन्यात वानरांनी दोनशेपेक्षा अधिक कुत्र्यांचा बळी घेतला असून गाव परिसरात कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button