प्रविण तोगडिया : “मोदी सरकारला रामराज्याचा विसर पडला” | पुढारी

प्रविण तोगडिया : "मोदी सरकारला रामराज्याचा विसर पडला"

नागपूर, पुढारी ऑनलाईन

“अयोध्येत राम मंदीर होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पण, आज रामाच्या नावावर सत्तेत आलेले रामराज्य विसरले आहे”, अशी टिका आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

“केंद्रातील सत्ताधारी रामामुळेच सत्तेत आले आहे. मात्र, ते रामराज्य विसरले आहे. भारताला अमेरिका करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आम्हाला भारतात रामराज्य हवे आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली हिंदुंचा बळी दिला जात आहे. मुठभर भांडवलशहांच्या हातात संपत्ती एकवटली जात आहे. तर गरीब आणखी गरीब हाेत आहे. बेराेजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. राम राज्यात हे अपेक्षित नव्हते”, असे प्रविण तोगडिया म्हणाले.

भारतीय लोकसंख्येत असंतुलन निर्माण होत चालले आहे. विशेषत: हिंदुंच्या लोकसंख्येत हे असंतुलन प्रकर्षाने जाणवते. विविध धर्मांतील लोकांचा जन्मदर देखील वेगवेगळा आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्यावर बंदी आणणारा कायदा आणवा, अशी मागणीही तोगडीया यांनी केली.

“केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या जन्मदर वृद्धी अहवालातून हिंदुंचा जन्मदर २ टक्क्यांवर स्थिरावला आहे. असेच सुरू राहिले तर १४० कोटींवरून हिंदुंची लोकसंख्या १०० कोटींवर यायला वेळ लागणार नाही”, असे तोगडीया म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणीही तोगडीया यांनी केली. अगदी सुरूवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात या चौघांनी हिंदू जनजागरण करीत अयोध्येत राम मंदीर व्हावे यासाठी वातावरण निर्मिती केली. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात यावा, असे तोगडीया म्हणाले.

पहा व्हिडीओ : J1 झालं का? असं मुलं मुलींना का विचारतात? 

हे वाचलंत का ?

Back to top button