नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
PM-Kisan : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी सोमवारी दिली. शेतकऱ्यांना दिला जात असलेला हा 10 वा हप्ता आहे. निधी वर्ग होण्यापूर्वी राज्य सरकारांना ट्रान्स्फर रिक्वेस्टवर सही करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्राकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये वर्ग केले जातात.
असंख्य शेतकऱ्यांना नववा हप्ता अद्याप मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना नववा आणि दहावा असे दोन्ही हप्ते दिले जातील. म्हणजे अशा शेतकऱ्यांना यावेळी चार हजार रुपये मिळणार आहेत.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून दर तीन महिन्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यानूसार दोन हजारांचा हफ्ता जमा करण्यात येतो.
शेतकरी म्हणून नोंदणी असलेले ११.३७ कोटी नागरिक केंद्राच्या या (PM-Kisan) योजनेचे लाभार्थी आहेत.
हे पैसे अडचणीच्या काळात वापरता येत असल्याने, शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असा दावा यानिमित्ताने केंद्राकडून केला जातो.