Goa Panjim Beautiful Shri Maruti Temple : गोव्यात गेला की ‘हे’ अप्रतिम मारुती मंदिर पाहायला विसरु नका | पुढारी

Goa Panjim Beautiful Shri Maruti Temple : गोव्यात गेला की 'हे' अप्रतिम मारुती मंदिर पाहायला विसरु नका

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर गोव्यातील पणजी, मळा येथील श्री श्री मारुतीराय संस्थान मंदिर अप्रतिम तर आहेच, शिवाय, त्याच्या स्थापत्यशैलीमुळे मंदिराने वेगळी ओळख निर्माण केलीय. मारुती वा हनुमानाचे मंदिराची रचना प्रादेशिकरित्या बदलत जाते. गोव्यातही या मंदिराची रचना आगळी वेगळी आहे. नेहमीच्या मंदिरासारखी आपणास ती दिसत नाहीत. अल्तिनो डोंगरावर हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या तीन कप्प्यांमध्ये हे मंदिर विस्तारलेले आहे. मंदिराजवळ पोहोचल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला मंदिराकडे जाणाऱ्या असंख्य पायऱ्या दिसतील. पायथ्यालाचं असे वाटेल की, हा डोंगर चढून मंदिरात जावे लागते की की काय? पण, या येथून रस्ता पुढे गेला आहे, जिथे चारचाकी आणि दुचाकी घेऊन जाता येते. अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडीने पोहोचता येतं. पायऱ्या चढूनही जाता येते.

भगवान हनुमानला इष्टदेवच्या रूपात स्थापित करण्यात आला आहे. रात्रीचे हे मंदिर विद्युत रोषणाईमुळे दैदिप्यमान ठरते. दूरवरूनदेखील हे मंदिर झगमगते दिसते.

सायंकाळी ७-८ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. पांढरा, भगवा, लाल आणि पिवळ्या रंगांनी सजवलेले मंदिर पाहणाऱ्यांना आकर्षित करते. परदेशी पर्यटक तर याठिकाणी आवर्जून भेट देतात.

मंदिरात जाण्यासाठीचे नियम –

अनेक मंदिरांप्रमाणेच या मंदिरात जाण्यासाठी कपड्यांसंबंधित काही नियम लागू करण्यात आले आहे. पुरुषांना फाटकी जीन्स, बरमोडा किंवा थ्री-फोर्थ पँट घालून जाणे बंदी आहे तर महिलांना शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट ड्रेस, शॉर्ट मिनी ड्रेस घालून मंदिरात प्रवेश करता येत नाही.

यासाठी मंदिरात एका बॉक्समध्ये वस्त्र ठेवले आहेत, जे परिधान करून तुम्ही मंदिरात जाऊ शकता. शिवाय मंदिर खूप मोठे असून, पाहण्यासारखे आहे. बाहेर कितीही ऊन असले तरी मंदिरात प्रवेश केल्यानंतर थंड वातावरणाची अनुभूती येते.

अगरबत्ती आणि धूपचा दरवळणारा गंध धार्मिक वलय तयार करते. अष्टकोनी दीस्तंभ आणि लॅम्प टॉवर येथील आकर्षण आहे. मुख्य रस्त्यावरून हे मंदिर डोंगराच्या तीन स्तरांमध्ये वसलेले खूप सुंदर दिसते. दर्शन घेऊन मंदिर पाहण्यासाठी १ तासाचा वेळ पुरेसा ठरतो.

श्री मारुती मंदिराकडे जाण्यासाठीचे अंतर –

पणजी-कदंब बस स्टँडपासून ३.३ किमी.

म्हापसा येथून १७ किमी.

वास्को रेल्वे स्टेशनपासून २८ किमी.

श्री मारुती संस्थान असलेले हे मंदिराची सुंदर वास्तुकला यापूर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल. पावसाळ्यात या मंदिराच्या डोंगरावरूनच छोटे-छोटे झरे प्रवाहित होऊन खाली येतात. मळा येथील श्री मारुतीराय संस्थानच्या जत्रोत्सव १० दिवसांचा मोठा वार्षिक उत्सव असतो.

खूप दूरवरून पर्यंटक याठिकाणी भेट द्यायला येतात. तर भाविकांची नेहमीच गर्दी असलेले ठिकाण आहे.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात अगरबत्ती, फुले, तेल, काळी उडीद, मीठ, रुईची पाने, फुलांचे हार, विक्री करण्यासाठी स्थानिक लोकांची छोटी-छोटी दुकाने आहेत.

या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डोंगरावरून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पोर्तुगीज वास्तुकला रचना असणारी असंख्य घरे देखील नजरेस पडतात. काही पर्यटक याठिकाणी फोटोशूट करण्यासाठी आवर्जून थांबतात.

पणजीमध्ये आणखी पाहण्यासारखी सुंदर मंदिरे –

श्री आप्तेश्वर गणपति मंदिर, महालक्ष्मी मंदिर, श्री साईं बाबा मंदिर, श्री सती मंदिर

– संकलन : स्वालिया शिकलगार

हेदेखील वाचा- 

Back to top button