Unseen Konkan: मालवणमधील ‘ही’ प्रसिध्द ठिकाणे पाहिली का? | पुढारी

Unseen Konkan: मालवणमधील 'ही' प्रसिध्द ठिकाणे पाहिली का?

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क – कोकण फिरायचं म्हटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती गोष्ट म्हणजे, वाहतूक आणि रस्ते. कुठल्याही ठिकाणी जाताना रस्ते जर चांगले असतील तर तासनतास प्रवास करायला काहीही वाटत नाही. तर मग चला नव्या ठिकाणी भेट द्यायला! कोकणात जायला सर्वांनाच आवडतं. त्यात आरामदायी कोकणची (Unseen Konkan) सफर करायला कुणाला आवडणार नाही? सिंधुदुर्गचा किल्ला, तारकर्ली तर आपण पाहिले आहेच. पण, जरा मालवणमध्ये तुमच्या गाडीची दिशा बदलून तर बघा. मालवणमधील तुम्ही कधी न पाहिलेले सौंदर्य तुम्हाला आँखो देखी मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्रसिध्द ठिकाणांबद्दल सांगणार आहेत, जी ठिकाणे कदाचित तुम्ही पाहिल नसतील किंवा क्वचितच या ठिकाणांची नावे ऐकली असतील. होय, आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वेगळ्या पर्यटन स्थळांविषयी सांगणार आहोत, जिथे जाणे सोपे तर आहेच, शिवाय खरा कोकण असतो तरी काय? याची अनुभूती घेण्यासाठी तुम्ही याठिकाणी नक्की जाल!  (Unseen Konkan)

तर आम्ही मालवण तालुक्यातील धामापूर, भगवती देवी मंदिर, रात्रीस खेळ चाले वाडा, ठाकर आदिवासी ट्रायबल म्युझियम/ पपेट म्युझियम, ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम ॲण्ड आर्ट गॅलरी या ठिकाणांविषयी सांगणार आहोत. (Unseen Konkan)

धामापूर गाव 

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात येथील हवामान थंड असते. आपण कधी पाहिली नसेल इतकी हिरवाई या भागात आहे. उंचच्या उंच माडाची झाडे, पोफळीच्या बागा, सुपारीचा माळ आणि त्यांतून पाटांमधून वाहणारे पाणी, सुंदर निसर्गरम्य व शांत वातावरण अशी धामापूरची ओळख आहे.

धामापूर तलाव :

धामापूर तलावाचे पाणी धामापूर, काळसे, गावांसह संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरविले जाते. अतिशय विस्तीर्ण असा तलावही धामापूरची ठळक वैशिष्ट्ये आहेत. तळ्यामध्ये नौकाविहाराची सुविधादेखील आहे. तलावाला लागूनच भगवती देवीचे मंदिर आहे. हा तलाव १५३० साली राजा नागेशराव देसाई यांनी निर्माण केल्याचे म्हटले जाते. येथे पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. कितीही पाऊस पडला तरी हा तलाव ओसंडून वाहत नाही. तर दुष्काळ पडल तरी तलावातील पाणी आटत नाही, असं म्हटलं जातं.
जवळच ७-८ किमीवर चौके मालवण येथे प्रसिद्ध असे भराडी देवीचे मंदिर आहे.

कसे जाल?

कोल्हापूरपासून जायचे असेल तर : कोल्हापूर- बालिंगे-कळे-असळज-गगनबावडा-वैभववाडी-तळेरे-नांदगाव-कणकवली-कसाल-कट्टा बाजारपेठ-नेरूर-मळकेवाडी-धामापूर गाव. तसेच मुंबईपासून रेल्वे आहे. मुंबई ते कुडाळ असा कोकण रेल्वेचा प्रवास तुम्ही करू शकता. रेल्वे स्टेशनपासून धामापूर हे अंतर १४ किमी. आहे. येथे एसटीबस किंवा रिक्षाने जाता येईल.

भगवती देवी मंदिर :

धामापूर तलावाच्या काठावरच भगवती देवीचं मंदिर आहे. भगवती मंदिराची स्थापत्यशैली पारंपरिक कोकणी पध्दतीची आहे. भगवती देवीचे मंदिर कौलारू आहे. ४८०  वर्षाहूनही अधिक जुना इतिहास श्री देवी भगवती मंदिराला आहे. मंदिरावर कोरीव कलाकुसर केले आहे. भगवती देवीची काळ्या पाषाणात कोरलेली सुबक आणि आकर्षक मूर्ती आहे. भगवतीची मूर्ती चतुर्भूज आहे.  शेजारीच खूप मोठे आणि अनेक वर्षे वारुळ आहे. येथे वारुळाचे मंदिर असून त्याची नित्यनियमाने पूजा केली जाते. या मंदिराला सातेरी देवीचे मंदिर असे म्हटले जाते. पर्यटनासाठी म्हणून धामापूर गाव प्रचलित झाले आहे. सिंधुदुर्गचे पर्यटन करणाऱ्या पर्यटकांनी धामापूरला एकदा जाऊन यायलाच हवे!

रात्रीस खेळ चाले वाडा :

रात्रीस खेळ चाले वाडा पाहण्यासाठी धामापूर तलावापासून ४० मिनिटांचे अंतर आहे. धामापूर गावातून झारप -अक्केरी रोड आहे. हा रोड हायवेला जोडतो. तेथून वाड्याकडे जाणारा मार्ग आहे. हा वाडा जसा मालिकेत दिसतो, तसाच आहे. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, शेणाने सारवलेली जमीन, स्वयंपाक घर, घराच्या मागील बाजूस विहिर आणि सभोवताली झाडी सर्वकाही जसं आहे तसं. हा वाडा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलं आहे.

कसे जाल?

धामापूर-मळकेवाडी-कळसे-जकात नाका-मलवण रोड-झारप तिट्टा-झारप अक्केरी रोड-शेटकर वाडा (रात्रीस खेळ चाले वाडा)

कोकम फळ

स्वयंरोजगार आणि व्यवसाय –

भगवती मंदिराजवळ काही स्थानिक येथे आवळा सरबत, सिरप, कोकम, कोकोनेट तेल, जास्वंदी तेल, शिकाकाई अशा असंख्य कोकणी पदार्थ, वस्तू विकायला ठेवलेल्या असतात. या कुठल्या कंपनीकडून नव्हे तर ओरिजिनल हातापासून बनवलेले पदार्थ इथे मिळतात. तर काही अंतरावर कंपनीच्या विविध वस्तू जसे की, आंबा बर्फी, कोकोनेट बर्फी, आवला ज्यूस, कोकम, काजू, फणस चीफ्स वगैरे आदी पदार्थ मिळतात.

ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम ॲण्ड आर्ट गॅलरी – पिंगुली (pinguli) या गावात हे आंगण आहे. सिंधुदर्ग जिल्ह्यातील ठाकर आदिवासी समाजाच्या परंपरा जपून ठेवण्यासाठी हे संग्रहालय बनवलं आहे. आधीचा आदिवासी समाज कसा राहत होता, त्यांची जीवनशैली कशी होती? याविषयीची माहिती अनेक पुतळे, वस्तू, कपडे आदींच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येथे ठाकर आदिवासी ट्रायबल म्युझियम किंवा पपेट म्युझियमदेखील आहे.
करवंद

 

Back to top button