Weather Report : शहरात दिवसभर उन्हाचा चटका, सायंकाळी पावसामुळे हायसे | पुढारी

Weather Report : शहरात दिवसभर उन्हाचा चटका, सायंकाळी पावसामुळे हायसे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात मंगळवारी दिवसभर उन्हाची तलखी होती. सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत भयंकर उकाडा होता. मात्र, सायंकाळी 5.30 नंतर आकाश काळ्याभोर ढगांनी झाकोळले. सोसाट्याचा वारा सुटला. रिमझिम पावसाने मृदगंध दरवळला. त्यानंतर सुमारे अर्धा तास शहरातील बहुतांश भागात जोरदार पावसाने रस्ते चिंब भिजवून टाकले. शहरातील कमाल तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी कोरेगाव पार्कचा पारा राज्यात सर्वाधिक 43.2 अंशांवर गेला. मात्र हवामान शास्त्राच्या नियमानुसार शिवाजीनगरचे तापमान हे प्रमाण मानले गेल्याने कोरेगावाच्या तापमानाची राज्यात सर्वाधिक म्हणून नोंद घेण्यात आली नाही. दिवसभर उन्हाचा तडाखा सहन केल्यावर सायंकाळी मात्र शहरावर जलधारा बरसल्याने दिवसभराचा थकवा गेला अन् उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना हायसे वाटले.

सलग 45 दिवस तापमान 39 अंशांवर

शहराचे कमाल तापमान गेल्या 45 दिवसांपासून 38 ते 39 अंशावर स्थिर आहे. मार्चचा संपूर्ण महिना शहराचे तापमान सरासरी 38 अंशांवर होते. कधी पारा 40 ते 41 अंशांवर जात होता. मार्चचे 31 तर एप्रिलचे 16 दिवस असा एकूण 45 ते 47 दिवस शहराचा पारा 39 अंश सेल्सिअसवर आहे.

सर्वत्र पाऊस अन् मृदगंध

सायंकाळी 5.30 ते 6 पर्यंत जोरदार पाऊस झाला. यात कात्रज रस्ता, नगर रस्ता, पाषाण, बाणेर, औंध, शिवाजीनगर, कर्वेरस्ता, भोसले नगर, डेक्कन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता, कोथरुड, वारजे, चिंचवड, दापोडी या भागात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

अर्ध्या तासाच्या पावसाने रस्त्यांना आला पूर

शहरातील शिवाजीनगर, नारायण पेठ, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर अर्ध्या तासाच्या पावसाने जणू पूर आला. अबालवृध्दांनी घराच्या गच्चीवर, रस्त्यावर येत पावसात मनसोक्त भिजून अंगाची काहीली शांत केली.

मंगळवारचे कमाल तापमान…

  • कोरेगाव पार्क 43.2, वडगाव शेरी 42.8, चिंचवड 42.5, बालेवाडी 42.1,
  • मगरपट्टा 42, लवळे 41.9,
  • शिवाजीनगर 40.7, पाषाण 40.4

शहरावर बाष्पयुक्त ढगांची गर्दी

शहरावर सोमवारपासून बाष्पयुक्त (क्युमूनोलिंबस) ढगांची गर्दी झाली आहे. त्यामुळे मंगळवारी जोरदार पाऊस झाला. हवामान शास्त्रज्ञांच्या मते कमाल तापमानातील विक्रमी वाढ आणि बाष्पयुक्त वारे यामुळे हा पाऊस होत आहे.

गेल्या दोन दिवसांत शहराच्या कमाल तापमानात मोठी वाढ आहे. शिवजीनगर 40.8 तर लवळे 43.2 असे कमाल तापमान आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे शहरात आल्याने त्या दोन वार्‍यांच्या घर्षणामुळे शहरात पाऊस पडत आहे. दरवर्षी एप्रिल, मे आणि जूनमध्ये असा पाऊस पडतच असतो.

– डॉ. एस. डी. सानप, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे

मंगळवारचा पाऊस (मी.मी. मध्ये)

  • लोहगाव 10.4
  • शिवाजीनगर 5
  • लवळे 1.5
  • हडपसर 0.5
  • एनडीए 2

हेही वाचा

Back to top button