Weather Report | महाराष्ट्रासह इतर राज्यांत उष्णतेची लाट; तर राज्यातील ‘या’ भागांत गारपिटीचा इशारा | पुढारी

Weather Report | महाराष्ट्रासह इतर राज्यांत उष्णतेची लाट; तर राज्यातील 'या' भागांत गारपिटीचा इशारा

पुणे/नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह (कोकणचा काही भाग) अकरा राज्यांत पुढील तीन दिवस (20 मेपर्यंत) उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाने शुक्रवारी दिला. दरम्यान, उष्णतेच्या लाटेबरोबरच महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत गारपीट, तर विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वार्‍यांसह पाऊस पडेल, तसेच दक्षिण भारतात मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील कोकणच्या काही भागांत उष्णतेची लाट येणार आहे. बिहार, राजस्थान, गुजरातचा काही भाग, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा उत्तर भाग, ईशान्य भारतामधील काही राज्ये अशा किमान अकराहून अधिक राज्यांत तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. 20 मेपर्यंत असणार्‍या उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानाचा पारा 45 ते 46 अंशांपर्यंत
जाईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, बिहार तसेच उत्तर प्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा जोरदार फटका बसणार आहे.

राज्याच्या काही भागांत अवकाळी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण तामिळनाडू, रॉयलसीमा उत्तर तामिळनाडू या भागांत चक्रीय स्थिती, दक्षिण छत्तीसगड ते कोमोरीन द्रोणीय स्थिती, ईशान्य राजस्थान ते उत्तर महाराष्ट्र ते पुढे पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती, याबरोबरच मध्य पूर्व अरबी समुद्रापासून ते येमेनपर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या सर्व स्थितींच्या एकत्रित परिणामामुळे राज्यातील कोकण (काही भागांत), मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत गारपीट होणार आहे. या गारपिटीमुळे कोकणातील आंब्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

मध्य महाराष्ट्रातील उन्हाळी पिकांना जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषत:, उन्हाळी बाजरीचे शेतकर्‍यांच्या हाताशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे वाया गेले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस (दि. 20 मेपर्यंत) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भात वादळी वारे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार आहेत, मेघगर्जना तसेच विजांचा गडगडाटदेखील जोरदार होणार आहे. या स्थितीमुळे अवकाळी पाऊस व गारपीट वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रात पाऊस कमी, उकाडा जास्त राहणार

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 18 व 19 रोजी गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह (30-40 कि.मी. प्रतितास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस हलका ते मध्यम राहील त्यामुळे दिवसा उष्णतेची लाट आणि सायंकाळी हलका पाऊस, असे वातावरण राहील. पुढील 24 तासांत महाराष्ट्रात कमाल तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही. कमाल तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्याचे शुक्रवारचे तापमान

जळगाव 42.8, पुणे, अहमदनगर 37.2, जळगाव 42.8, कोल्हापूर 36.8, मुंबई 34, महाबळेश्वर 28.1, मालेगाव 39.2, नाशिक 38.1, सांगली 37.5, सातारा 37.7, सोलापूर 38.6, छ. संभाजीनगर 39.9, परभणी 38.1, नांदेड 38.6, बीड 38.2, अकोला 42.4, अमरावती 40.8, बुलडाणा 38, ब्रह्यपुरी 41.2, चंद्रपूर 37.8, गोंदिया 38.4, नागपूर 38.8, वाशिम 41.2, वर्धा 40, यवतमाळ 40.

हेही वाचा

Back to top button