जळगाव : ५१ वी वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघास राष्ट्रीय विजेतेपद | पुढारी

जळगाव : ५१ वी वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघास राष्ट्रीय विजेतेपद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
ग्वाल्हेर येथे दिनांक ६ ते १० एप्रिल दरम्यान लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे संपन्न झालेल्या ५१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष व महिला अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात सिविल सर्विसेस संघावर दोन – एकने विजयश्री खेचून राष्ट्रीय विजेतेपद प्राप्त केले आहे.

सामन्यात पहिल्या एकेरीच्या सामन्यात जैन इरिगेशनचा संदीप दिवे हा सिविल सर्विसेसच्या अब्दुल रहमान विरुद्ध पराभूत झाला. एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात जैन इरिगेशनच्या जैद अहमद फारुकीने सिव्हिल सर्विसेसच्या सोनू चौधरी वर विजय मिळवून संघास एक-एक अशी बरोबरी करून दिली. दुहेरीच्या निर्णायक सामन्यात जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडे आणि अभिजीत त्रिपणकर यांनी सिविल सर्विसेसच्या प्रफुल्ल मोरे आणि राहुल सोलंकी ह्या जोडीवर सरळ दोन सेटमध्ये विजय प्राप्त करून आपल्या संघास दुसरे राष्ट्रीय विजेतेपद प्राप्त करून दिले. यापूर्वी जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सन 2020 मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या अंतर संस्था राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले होते. तत्पूर्वी एकूण 26 राज्य आणि 12 संस्था मधील एकूण 230 खेळाडूंमधील एकेरीच्या लीग स्पर्धेचे निकालाचे आधारावर जैन इरिगेशन संघाची आंतर संस्था सांघिक विजेतेपद गटातील अंतिम चार संघात दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली. त्यात पहिल्या उपांत सामन्यात सिविल सर्विसेसने रिझर्व बँक ऑफ इंडियावर दोन-एक ने विजय प्राप्त केला, तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात जैन इरिगेशन संघाने सी.ए.जी. (CAG ) संघावर दोन-एकने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात एकेरीच्या सामन्यांमध्ये जैन इरिगेशनच्या संदीप दिवे आणि जैद अहमद फारुकी यांनी विजय मिळविला होता.

अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या कुलपती सौ. इंदू बोरा, आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे अध्यक्ष जोसेफ मेयर (स्वित्झर्लंड), महासचिव व्ही.डी. नारायण, अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या महासचिव सौ. भारती नारायण व इतर पदाधिकारी तसेच मध्य प्रदेश कॅरम असोसिएशनचे काशीराम जी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अरुण केदार व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सहाव्या विश्व कप कॅरम स्पर्धेकरिता जैन इरिगेशनच्या संदीप दिवे व योगेश धोंगडे यांची निवड 
दरम्यान सदर ५१व्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धा आणि डिसेंबर २०२३ मध्ये विशाखापटणम्म येथे संपन्न झालेल्या २८व्या राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेच्या एकेरीच्या सामन्यांमधील कामगिरी आधारे भारतीय संघाच्या आठ सदस्ययी संघात जैन इरिगेशनच्या संदीप दिवे आणि योगेश धोंगडे यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर खेळाडू दिनांक १० ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे होणाऱ्या सहाव्या विश्व कप कॅरम स्पर्धेकरिता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतील. जैन इरिगेशन संघाच्या सदर यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, संचालक श्री.अतुल जैन, मुख्य प्रशासकीय क्रीडा अधिकारी श्री. अरविंद देशपांडे तसेच सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

मागील आठवड्यात आमच्या कॉर्पोरेट क्रिकेट संघाने टाइम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले व काल ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे ५१ व्या सिनियर कॅरम स्पर्धेत सिव्हिल सर्व्हिसेस यांच्या संघावर २-१ अशी मात करताना राष्ट्रिय विजेतेपद पटकावले याचा मनस्वी आनंद होतो आहे अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे सिस्टिम्स लि. चे अध्यक्ष श्री अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केली. जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक श्री अतुल भाऊ जैन यांनी सुद्धा या विजेतेपदा बद्दल आनंद व्यक्त केला व सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक केले आहे.

हेही वाचा:

Back to top button