मविआच्या काळात मुंबईच्या विकासाला खीळ : पंतप्रधान मोदी

मविआच्या काळात मुंबईच्या विकासाला खीळ : पंतप्रधान मोदी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा माओवादी अर्थविचार मुंबईसह देशावर गंभीर संकट आणणारा आहे. त्यांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करायची झाल्यास देशाचेच दिवाळे निघेल, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

महाविकास आघाडीने बहुमताचा अपमान करून सरकार बनवले, तेव्हा विकास प्रकल्पांना अडवण्याचे काम केले. विविध विकासकामे रोखून धरत मुंबईकरांसोबतच शत्रुत्व काढत राहिले. आज मोदी मुंबईला तिचा हक्क परत करण्यासाठी आला आहे. जगातील आधुनिक पायाभूत सुविधा मुंबईला मिळत आहेत, हाच मोदींचा संकल्प आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. येत्या काही दिवसांत देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईतून धावेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईकरांना विकासासाठी आणि विकसित भारतासाठी भरूभरून मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी यंदाच्या लोकसभेचे निकाल जुने सर्व रेकॉर्ड तोडणारे असतील, असे सांगत भाजप महायुतीच्या विजयाचाही दावा केला.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील महायुतीच्या प्रचारसभेत मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्यातील मंत्री उदय सामंत, दिपक केसरकर, मंगल प्रभात लोढा यांच्यासह विनोद तावडे, आशिष शेलार, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आदी नेते उपस्थित होते. याशिवाय, पीयूष गोयल, रवींद्र वायकर, उज्ज्वल निकम, मिहीर कोटेचा, राहुल शेवाळे, यामिनी जाधव हे मुंबईतील महायुतीचे सर्व सहाही उमेदवार मंचावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असतानाच मोदींचे मंचावर आगमन झाले. त्यावेळी शिवाजी पार्कात एकच जल्लोष आणि मोदी, मोदीचा गजर सुरू झाला. छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या जयकाराने मोदी भाषणाला उभे राहिले. 'समस्त मुंबईकरांना माझा रामराम. कसे आहात तुम्ही?', अशी मराठीत ख्याली विचारत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उराशी स्वप्न बाळगून संकल्प करणार्‍याला मुंबईने कधीच निराश केले नाही. या ड्रीम सिटीमध्ये मी तुमच्यासमोर 2047 चे ड्रीम घेऊन आलो आहे. भारताला विकसित बनवण्याचे स्वप्न. त्यात मुंबईची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस भंग करावी, अशी सूचना महात्मा गांधी यांनी केली होती. त्यानुसार काँग्रेसचे विसर्जन केले असते, तर आज भारत 5 दशके पुढे असता. स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्वच क्षेत्रांचे काँग्रेसीकरण झाले, त्यामुळे अनेक पिढ्या वाया गेल्या, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 2014 मध्ये जेव्हा काँग्रेस गेली आणि आमच्याकडे सत्ता आली, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावरून 11 स्थानावर गेलेली होती. आम्ही ती पाचव्या स्थानावर आणली. आज देशात, मुंबईत रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक येत आहे. येत्या काही वर्षांत जेव्हा मी तुमच्या समोर येईन, तेव्हा आपण तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतलेली असेल, ही माझी गॅरंटी आहे, असे मोदी म्हणाले. तुम्हाला विकसित भारत देऊनच हा मोदी जाणार आहे. त्यासाठीच अहोरात्र 2047 च्या विकसित भारतच्या मंत्रासह प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि देशासाठी प्राणपणाने कामाला लागल्याचेही मोदी म्हणाले.

मोदी जे बोलतो, ते करणे शक्य नाही, असा आरोप विरोधक करतात. अशी नकारात्मक भूमिका घेऊन विरोधक काहीच करू शकत नाही. राम मंदिराबाबतही ते असेच म्हणत होते. अनेक पिढ्यांचा संघर्ष, लाखो लोकांच्या बलिदानानंतर आज रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान आहेत. पाचशे वर्षांची ही स्वप्नपुर्ती आहे. निराशाग्रस्त विरोधकांना 370 हटविणेही अशक्य वाटत होते. आपल्या डोळ्यांदेखत कलम 370 ची भिंत कब्रस्तानात गाडली. हे कलम पुन्हा लागू करू, अशा घोषणा काहीजण करीत आहेत. त्यांना मी एकच सांगू इच्छितो, जगातील कोणतीही ताकद 370 कलम पुन्हा आणू शकत नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ट्रिपल तलाकलाही भारतीय संसदेने तलाक देऊन टाकला. आज संविधान डोक्यावर घेऊन नाचणार्‍या विरोधकांनी कधी काळी महिलांच्या 33 टक्के आरक्षणाचे बिल संसदेत फाडले. यांच्या छाताडावर बसून आज महिला आरक्षण लागू झाले आहे असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसचा जाहीरनामा माओवादी

काँग्रेसच्या माओवादी जाहीरनाम्यात जितक्या घोषणा आहेत, त्याची अंमलबजावणी करायची झाल्यास देशाचे दिवाळे निघेल. यांची नजर मंदिरांतील सोन्यावर आहे, महिलांच्या मंगळसूत्रावर आहे. तुमची संपत्ती काढून घेऊन, जे व्होट जिहाद करतात, त्यांना देण्याचे मनसुबे आहेत. कारण काँग्रेसला अस्तित्व वाचवण्यासाठी निवडणूक जिंकण्याची गरज आहे. इंडिया आघाडीची माओवादी अर्थव्यवस्था मुंबईवर, देशावर गंभीर संकट आणू पाहत आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे माओवादी अर्थविचार मुंबईच्या विकासाच्या चाके रोखणारी असल्याचेही मोदी म्हणाले.

नकली शिवसेनावाल्यांनी बाळासाहेबांना धोका दिला

या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हुंकार घुमायचा. पण, आज हे लोक सावरकर आणि बाळासाहेबांना अपमानित करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. कधी काळी मुंबईत शिवसेनेच आवाज घुसखोरांच्या विरोधात घुमायचा. आता मात्र ते हिंदू, बौद्ध, शिख शरणार्थींना नागरिकत्व देणार्‍या कायद्याच्या विरोधात उभे राहिले आहेत. या नकली शिवसेनेचे जितके ह्रदयपरिवर्तन झाले तितके देशात अन्य कोणत्याच पक्षाचे झाले नाही. आज कसाबला क्लीनचिट देत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवर पाकिस्तानची भाषा बोलत भारतीय सैन्यावर प्रश्न करत आहेत. या नकली शिवसेनावाल्यांनी बाळासाहेबांबा धोका दिला, शिवसैनिकांच्या बलिदानाशी दगाबाजी केली, असा हल्लाबोलही मोदींनी केला.

व्होट बँकेला खुश करण्यासाठी देशाला धोका

मी आज शिवतीर्थावरून शरद पवारांना आव्हान करतो, वीर सावरकरांचा अवमान करणार्‍या राहुल गांधीकडून वदवून घ्या, मी जीवनभर कधीच सावरकरांविषयी गैर उद्गार काढणार नाही. पण ते तसे करणार नाहीत. कारण, त्यांचे राजकारण तुष्टीकरणाचे आहे. आपल्या व्होट बँकेला खुश करण्यासाठी यांनी संपूर्ण देशाला धोका दिला आहे. ज्या कसाबने निष्पाप जीवांचे बळी घेतले, त्या कसाबला हे लोक क्लीन चिट देत आहेत, असेही मोदी म्हणाले.

मोदी संविधानाचा सर्वात मोठा रक्षक

बाबासाहेब आंबेडकर धर्माच्या आरक्षणाविरोधात होते. पण विरोधक दलित, वंचितांच्या हक्काचे आरक्षण काढून त्यांच्या व्होट बँकेला देऊ इच्छित आहे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही. हा मोदी संविधानाचा सर्वात मोठा रक्षक आहे. संविधानाला सर्वात आधी तोडण्याचे काम काँग्रेसने केले. संविधानाच्या आत्म्याचा यांनी गळा घोटला, आता ते पाठीत वार करू इच्छित आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणार ः राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतपधान होतील असा विश्वास व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात अनेक योजना झाल्या. पण, यापेक्षा काश्मीरमधून 370 कलम हटविले, अयोध्येत राम मंदिर उभारले, तीन तलाखचा विषय मिटवून मुस्लिम महिलांना दिलासा देणारा कायदा केला, यासारखे धाडसी निर्णय केवळ मोदी पंतप्रधान होते म्हणूनच झाल्या. इतकी वर्षे जे झाले नाही ते करण्याचे धाडसी निर्णय मोदींने घेतले, असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर तिसर्‍यांदा पंतप्रधान होणार असून त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत, असे सांगत चार मागण्या मांडल्या.

1) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय गेली अनेक वर्षे खितपत पडला असून नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तात्काळ हा निर्णय घ्यावा
2) अरबी समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा उभा राहील की नाही माहित नाही पण त्यांचे खरे स्मारक असलेल्यांना शिवकालीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावरील समिती नेमावी. ज्यामुळे आमचा राजा कसा होता हे येणार्‍या पिढ्याना कळेल.
3) हिंदुस्थानभर पराक्रम गाजवणार्‍या मराठ्यांचा इतिहास देशातील विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात शिकवावा
4) मुंबई गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यानी व्यापला आहे. गेली अनेक वर्षे तो पूर्ण झालेला नाही तो तात्काळ पूर्ण व्हावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news