भारताचा चुकीचा नकाशा वापरल्यास सहा महिने कैद | पुढारी

भारताचा चुकीचा नकाशा वापरल्यास सहा महिने कैद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना देशाच्या नकाशाच्या वापराबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारताच्या नकाशाचा वापर करताना तो भारतीय सर्वेक्षण विभागाने तयार केलेलाच असावा. चुकीच्या नकाशाचा वापर करणे हा कायदेशीर गुन्हा असून, या गुन्ह्यासाठी सहा महिने कैद आणि दंड होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशभरातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने अभ्यासक्रमात काही बदल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘यूजीसी’चे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. देशाच्या नकाशाचा वापर करताना तो भारतीय सर्वेक्षण विभागाने तयार केलेलाच असावा, याची खात्री करावी, असे सांगत ‘यूजीसी’ने कायदा आणि न्याय मंत्रालयाने 1990 मध्ये कायद्यात केलेल्या सुधारणेचा संदर्भ दिला आहे. त्यानुसार कोणीही भारतीयाने नकाशाचा वापर केल्यास आणि तो भारतीय सर्वेक्षण विभागाच्या नकाशाप्रमाणे नसल्यास कायदेशीर गुन्हा ठरतो. या गुन्ह्यासाठी सहा महिने कैद आणि दंडाची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Back to top button