राहुल यांना भाजप, भाकपचे आव्हान | पुढारी

राहुल यांना भाजप, भाकपचे आव्हान

देशाचे लक्ष असलेल्या काही प्रमुख मतदार संघांत केरळमधील वायनाड मतदार संघाचा समावेश होतो. त्याचे कारण काँग्रेस नेते राहुल गांधी या ठिकाणाहून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासमोर ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’च्या अ‍ॅनी राजा आणि भाजपचे के. सुरेंद्रन यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. या मतदार संघात 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड मतदार संघातून यावेळी दुसर्‍यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी याआधी 2019 मध्ये मोठ्या मताधिक्याने ही जागा जिंकली होती. त्यावेळी राहुल गांधी दोन ठिकाणाहून नशीब आजमावत होते. वायनाडबरोबरच उत्तर प्रदेशातील अमेठीमधून त्यांनी निवडणूक लढविली होती. अमेठीतून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भारतीय जनता पक्षाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना पराभूत केले होते. गेल्यावेळी पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकणार्‍या राहुल गांधी यांना यावेळी केरळमधील भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या अ‍ॅनी राजा यांनी आव्हान दिले आहे. हे दोन्ही तगडे उमेदवार आहेत. के. सुरेंद्रन हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अ‍ॅनी राजा या सीपीआयचे महासचिव डी. राजा यांच्या पत्नी आणि सीपीआयमधील दिग्गज महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.

के. सुरेंद्रन हे भाजपमधील अत्यंत सक्रिय नेते आहेत. सबरीमाला आंदोलनात 2018 मध्ये ते पुढे होते. या काळात त्यांच्याविरोधात 237 गुन्हे दाखल झाले होते. सध्या त्यांच्याविरोधात एकूण 242 गुन्हे दाखल आहेत. ते केरळमधील एक प्रमुख नेते आहेत. भाजपने त्यांना 2020 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्याआधी 2019 मध्ये त्यांनी पथानामथिट्टा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होते. त्यांना तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांना 2018 च्या सबरीमाला आंदोलनात अटक झाली होती. एक महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांनी कारागृहामध्ये घालविला होता. त्यानंतर 2021 च्या केरळ विधानसभा निवडणुकीत त्यांनी मंजेश्वर आणि कोन्नी या दोन विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी मंजेश्वर विधानसभा मतदार संघातील बसपाच्या उमेदवार के. सुंदरा यांना उमेदवारी परत घेण्यासाठी लाच देऊन धमकावल्याचा आरोप झाला होता.

अ‍ॅनी राजा या सीपीआयच्या महिला फेडरेशच्या राष्ट्रीय महासचिव आणि सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील इरिट्टी या ठिकाणी जन्मलेल्या अ‍ॅनी राजा यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थिदशेत झाली. त्या सीपीआयच्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या विद्यार्थी संघटनेत आणि त्यानंतर ऑल इंडिया यूथ फेडरेशन या पक्षाच्या युवक संघटनेत सक्रिय होत्या. सीपीआयच्या कन्नूर जिल्हा महिला संघटनेच्या सचिव आणि राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठविला होता. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्यांनी अनेक आंदोलने केली.

वायनाड लोकसभा मतदार संघात सात विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. कलपेट्टा, मनंथावाडी, सुल्तान, बाथरी, तिरुवंबाडी, एरानाड, नीलांबूर आणि वंडूर अशी त्यांची नावे आहे. त्यातील कालापेट्टा आणि मनंथावाडी या जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. वंडूर हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. विधानसभेच्या 2021 च्या निवडणुकीत मनंथावाडी, तिरुवंबाडी आणि नीलांबूर या जागा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) पक्षाने जिंकल्या होत्या. डाव्या लोकशाहीवादी मोर्चाची राज्यात हवा असतानाही इतर चार जागा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटने जिंकल्या होत्या. वायनाडमध्ये एकूण मतदारांमध्ये तीन टक्के अनुसूचित जाती, 9.5 टक्के अनुसूचित जमाती, 32 टक्के मुस्लिम आणि 13 टक्के ख्रिश्चन आहेत.

राहुल गांधी यांनी गेल्यावेळी जिंकली तितक्या सहजपणे यावेळी निवडणूक जिंकतील, अशी स्थिती नाही. इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर राहुल गांधी यांना केरळमध्ये निवडणूक लढविण्यावर डाव्या पक्षांनी आक्षेप घेतला होता. राहुल गांधी इंडिया आघाडीचे मुख्य नेते आहेत. त्यांनी भाजपच्या मुख्य नेत्याविरोधात रिंगणात उतरायला हवे, असे डाव्या आघाडीचे मत होते. राहुल हे सध्या या मतदार संघाचे खासदार आहेत. त्यामुळे ते इथूनच लढतील, असे काँग्रेस नेते सांगत होते. त्यामुळे राहुल गांधी यांना भाजपबरोबरच भारतीय कम्युनिस्ट पक्षाशीही टक्कर द्यावी लागत आहे.

 

Back to top button