Nashik Lok Sabha Election 2024 | नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार! | पुढारी

Nashik Lok Sabha Election 2024 | नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत सुरू असलेला संघर्ष अधिकच पेटला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली असताना, या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सोमवारी (दि. १५) रात्री उशिरा मुख्यमंखी एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेत नाशिकची जागा शिवसेनाच लढविणार आणि जिंकणार, असा दावा केला आहे. येत्या २-३ दिवसांत नाशिकच्या जागेबाबत निर्णय होईल. धनुष्यबाणाचाच उमेदवार असेल, असा विश्वास बोरस्ते यांनी व्यक्त केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना, उमेदवार निश्चितीवरून महायुतीत रस्सीखेच कायम आहे. नाशिकच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, भाजपनेदेखील आपला हक्क सोडलेला नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी अनेकवेळा ठाणेवारी करत मुख्यमंत्र्यांसमोर दावेदारी केली असताना, आता या उमेदवारीसाठी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचेही नाव पुढे आले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा गुंता अधिकच वाढला आहे. सोमवारी रात्री उशिरा बोरस्ते यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. बोरस्ते म्हणाले की, साेमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. नाशिकच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिकची जागा शिवसेनेला सुटावी, यासाठी मुख्यमंत्रीदेखील आग्रही आहेत. नाशिकची जागा आम्हाला सुटेल, असा विश्वास आहे. येत्या २ ते ३ दिवसांत निर्णय होईल, असा अंदाज आहे. नाशिकमध्ये धनुष्यबाणाचाच उमेदवार असेल, असेही बोरस्ते यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठलाही उमेदवार असो, तो उमेदवार निवडून येणारच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ४०० पारचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात आम्ही ४५ प्लस जागा निवडून येऊ, असे बोरस्ते म्हणाले.

नाशिकची जागा शिवसेनेला सुटावी, यासाठी मुख्यमंत्रीदेखील आग्रही आहेत. नाशिकची जागा आम्हाला सुटेल, असा विश्वास आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत निर्णय होईल. – अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट.

हेही वाचा:

Back to top button