

बारामती : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचे रण कमालीचे तापले असतानाही देश आणि राज्यपातळीवरील नेते असलेले दोन्ही पवार बारामतीतच अडकून पडले आहेत. सलग दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत मेळावे घेत आहेत तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही थेट अजित पवार यांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्याच भेटीचा सपाटा लावला आहे. राज्यभरात सभांसाठी फिरणारे शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी सकाळ- संध्याकाळ बैठकांचा धडाका सुरू आहे.
सोमवारपासून अजित पवार बारामतीत विविध मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. मंगळवारी शरद पवार यांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांची भेट घेतली. गत आठवड्यात शरद पवार यांनी काकडे परिवाराची भेट घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते व एकेकाळचे सहकारी चंद्रराव तावरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता बाळासाहेब तावरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बाळासाहेब तावरे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवार यांनी लाटे येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील सणस कुटुंबाचीही मंगळवारी भेट घेत सांत्वन केले. तसेच या विषयात लक्ष घालण्याचेही आश्वासन दिले. शरद पवार यांच्या गोविंदबागेत ते आले की, येथे बैठकांवर बैठका होत आहेत. राज्यभरातील पदाधिकारी त्यांना भेटत आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जात-धर्मनिहाय अनेक मेळावे पार पडत आहेत.
हेही वाचा