तडका : दादा, या आमच्याकडे..! | पुढारी

तडका : दादा, या आमच्याकडे..!

महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये एक डायलॉग प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे ‘दादा, बंगल्यावर या.’ हे दादा म्हणजे केवळ घड्याळवाले दादा नाहीत, तर गावोगावी प्रत्येक मतदारसंघात असलेले मोठे नेते, ज्यांना कुणी दादा, तात्या, आप्पा, बाप्पा, मामा, भाऊ, भैया, बॉस असे काहीतरी म्हणत असतात, ते सगळे दादा लोक आहेत. पक्षाने तिकीट वाटप जाहीर केल्याबरोबर दादा मंडळी उभी राहतात आणि बंडखोरीच्या हालचाली सुरू करतात. तेव्हा या लोकांना एकच निरोप जातो आणि तो म्हणजे ‘दादा, बंगल्यावर या.’ विशेषत: सत्ताधारी पक्षासाठी म्हणजे महायुतीसाठी ‘दादा, सागर बंगल्यावर या’ हाच निरोप सर्वत्र जात आहे.

तुम्हा-आम्हासारख्या सामान्य लोकांना प्रश्न हा पडलेला असतो की, बंगल्यावर का बोलवले जात असेल आणि तिथे नेमकी कोणती चर्चा होत असेल? एक तर बंगल्यावर समजावून सांगितले जात असेल, समज दिली जात असेल, सूचना दिली जात असेल, विनंती केली जात असेल किंवा सरळ सरळ धमकी दिली जात असेल. जे काय होत असेल ते असो; पण बंगल्यावर गेल्यानंतर 90 टक्के लोकांचे समाधान होते आणि बंगल्याच्या बाहेर येऊन पत्रकारांना सामोरे जाऊन देशहितासाठी किंवा मोदींसाठी आपण कशी माघार घेतली, हे ते सांगत असतात.

महाआघाडीच्या बंडखोरांना बंगल्यावरच बोलवले जाते; पण या बंगल्यांची नावे वेगळी आहेत. त्यांना मोदी बागेत या, मातोश्रीवर या किंवा सिल्व्हर ओकवर या, असे निरोप जातात. तिथे जाऊन चर्चा केल्यानंतर ते बाहेर पडतात आणि आपण निवडणूक लढवणार होतोच, बंडखोरी करणार होतोच; परंतु मोदींना पराभूत करण्यासाठी आपण माघार घेतली, असे सांगत असतात. यावेळीही त्यांचा चेहरा अत्यंत प्रसन्न वगैरे असतो. याचा अर्थ एवढाच की, बंगल्यावरील चर्चेमध्ये काही ना काही तरी मांडवली झालेली आहे. खासदारपदासाठी बाशिंग बांधून तयार असणार्‍या बंडखोराला आमदारकीचे गाजर दाखवले जाते आणि आज काहीतरी करून शांत बस, अशी त्याची समजूत घातली जाते. प्रत्येक पक्षाला आज आपल्या उमेदवारांचा मार्ग निष्कंटक असायला पाहिजे आहे.

संबंधित बातम्या

तुमच्या लक्षात येईल की, सध्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधून असंख्य गाड्या मुंबईला बंगल्यांच्या दिशेने धावत आहेत. एखाद्या बंडोबाने थोडी चुळबुळ केली किंवा थोडीशी हालचाल केली की, लगेच बंगल्यावर पाचारण करून प्रश्न सोडवण्यावर सध्या राजकीय लोकांचा भर आहे. बरेचसे लोक आपली दखल कोणीतरी घ्यावी म्हणून सुरुवात करतात आणि मग एकदाचे बंगल्यावर जाऊन येतात. बंगल्यावरून परत आले की, त्यांचे समाधान झालेले असते. येताना कोणी विधानसभेचे तिकीट निश्चित करून घेऊन येतो, कुणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद किंवा कोणी आणखी काही भक्कम प्राप्ती करूनही घेत असावेत, अशी शंका घेण्यास जागा आहे. एकंदरीत आता ही सगळी रणधुमाळी जोमात म्हणजे साध्या मराठीत सांगायचे तर फुल्ल स्विंगमध्ये आहे. प्रत्यक्ष कुस्तीला सुरुवात होण्याची वेळ आली आहे. इतके दिवस चालू होती ती खडाखडी होती. आता प्रत्यक्ष कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर चितपट कोण होणार, हे मात्र दोन जूनलाच कळणार आहे.

Back to top button