रत्नागिरी : खंडणी न दिल्याने सरपंचाचा एकावर चाकूहल्ला | पुढारी

रत्नागिरी : खंडणी न दिल्याने सरपंचाचा एकावर चाकूहल्ला

जालगाव; पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील अंजर्ले- पाडले गावच्या सरपंचाने केलेली खंडणीची मागणी पूर्ण न केल्याने संरपंचाकडून एकावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना अंजर्ले- पाडले गावात गुरूवारी (दि.२८) सकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुभाष राजेंद्र लोणारी (वय ३६, दापोली ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंचाविरोधात दापोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजर्ले-पाडले या गावच्या सीमेवर शार्प स्किल इफ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या साईटवर सुभाष लोणारी हे लायझिंग हेड म्हणून काम पाहतात. या साईडचे काम सुरू झाल्यापासून पाडले गावचे सरपंच रवींद्र सतनाक हा साईडच्या कामाबाबत खंडणीचे स्वरूपात सीनियर ऑफिसर दिपेंद्र गुप्ता यांचेकडून पैसे घेत होता.

दिपेंद्र गुप्ता यांची बदली झाल्याने दीड महिना त्यांचे काम हे सुभाष लोणारी हे सांभाळत आहेत. आज ( गुरूवारी ) सरपंचाने लोणारी यांच्या साईडवर सुरू असलेल्या कामकाजाबद्दल खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केली. लोणारी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सरपंच सतनाक याने फिर्यादी लोणारी यांना धमकी देत त्यांच्यावर चाकूने छातीवर व दंडावर वार केले. यामध्ये सुभाष लोणारी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button