मतदाराचे नाव सूर्यमुखी मंदिर, वडिलांचे गणेश मंदिर! मतदार यादीत गंभीर चुका | पुढारी

मतदाराचे नाव सूर्यमुखी मंदिर, वडिलांचे गणेश मंदिर! मतदार यादीत गंभीर चुका

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे गावातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गंभीर चुका झाल्या आहेत. एका मतदाराचे नाव सूर्यमुखी मंदिर, तर वडिलांचे नाव गणेश मंदिर, असे आढळून आले आहे. तसेच, यादीत काही बोगस मतदारांची नोंद केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ यांनी मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्त सर्व मतदार याद्या अंतिम झाल्या आहेत. म्हाळुंगे येथीलही मतदार यादीत अनेक नावे बोगस लावण्यात आलेली आहेत.

काही नावे गुजराती भाषेत आहेत. एका मतदाराचे नाव सूर्यमुखी मंदिर आणि वडिलांचे नाव गणेश मंदिर, लिंग महिला आणि वय 53 असे नोंदविण्यात आले आहे. यामुळे म्हाळुंगे गावातील मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका झाल्याचे निदर्शनास येत आहे. म्हाळुंगेचे रहिवासी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे याबाबत निवेदनाव्दारे तक्रार केली आहे. हे निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांनी स्वीकारले. या वेळी महादेव कोंढरे, सचिन खैरे, संतोष मोहोळ, स्वाती ढमाले, कोमल वाशिवले, निकिता सणस, राम गायकवाड, शिवाजी बुचडे, कैलास मारणे, विलास अमराळे, निकिता रानवडे, दीपाली कोकरे, स्वाती वाशिवले, गौरी भरतवंश तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button