Loksabha election | खेडमध्ये कार्यकर्त्यांची मने जुळणार? आढळरावांचाही लागणार कस | पुढारी

Loksabha election | खेडमध्ये कार्यकर्त्यांची मने जुळणार? आढळरावांचाही लागणार कस

कोंडीभाऊ पाचारणे

राजगुरुनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वाट्याला आलेली उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या (शिंदे गट) शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहाल केल्यात जमा आहे. सुरुवातीला विरोध करणारे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पक्षादेश व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मान ठेवून आढळराव पाटील यांच्याशी जुळते-मिळते घेण्याचा पवित्रा घेतला आहे. यानंतर दोन पाटलांचे जुळले असल्याचे मानले जाते. आता दोन्ही परस्पर विरोधी कार्यकर्त्यांमध्ये जुळविण्याचे कसब या नेत्यांना त्यातही आढळराव पाटील यांना पणाला लावावे लागणार आहे.

या दोन्ही पक्षांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना आढळराव पाटील किंवा मोहिते पाटील यांच्या ओंजळीने पाणी प्यायचे नाही अशी स्थिती आहे. या सर्वांना पक्षादेश आहे. मात्र, मनाने हे कार्यकर्ते जुळणार का? असे प्रश्न ऐन निवडणुकीच्या तोंडावर उभे राहिले आहेत. अनेक वर्षे ज्याला पाहिल्यावर डोक्यात तिडीक बसते अशा विरोधी कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागणार असल्याने महायुतीच्या खेड तालुक्यातील अनेक जणांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश, त्यानंतर उमेदवारी व लगोलग प्रचाराचा धुरळा उडणार आहे. एवढ्या लगीन घाईत अनेक वर्षांचा विरोध, संघर्ष बाजूला कसा करायचा हा यक्षप्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे.

महायुतीच्या तीन पक्षांमधील काहीजणांचे आढळराव पाटील यांच्याशी, तर काहींचे आमदार मोहिते पाटील यांच्याशी टोकाचे मतभेद आहेत. हे सर्व काही फक्त आढळराव पाटील यांच्या खासदारकीसाठी विसरायचे हे जमणे आणि जमवणे जिकिरीचे काम बनले आहे.
केवळ वरिष्ठ नेते सभेला आल्यावर व्यासपीठावर गर्दी पाहायला मिळणार की आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिरूरचा निकाल खेड विधानसभा ठरवतो

शिरूर लोकसभा मतदारसंघात निकालाअगोदरच खेडचे मतदार कौल देतात, असे मानले जाते. ज्या बाजूला खेडचे मतदार झुकले की त्या बाजूचे, त्या उमेदवाराचे पारडे जड होते असा यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा इतिहास आहे. सन 2019 च्या निवडणुकीत खेड तालुक्यातील 2 लाख 437 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील खासदार डॉ. कोल्हे यांना 99 हजार 583 एवढी मते मिळाली, तर माजी खासदार आढळराव पाटील यांना 92 हजार 137 मते मिळाली.

हेही वाचा

Back to top button