बारामती : उन्हाळ्याच्या झळा ! पिण्याच्या पाण्याबरोबर चार्‍याचा प्रश्न गंभीर | पुढारी

बारामती : उन्हाळ्याच्या झळा ! पिण्याच्या पाण्याबरोबर चार्‍याचा प्रश्न गंभीर

काशिनाथ पिंगळे

लोणी भापकर : बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात उन्हाळ्याचे चटके चांगलेच वाढू लागले आहेत. मोरगाव, सुपे, मुर्टी-मोढवे, लोणी भापकर परीसर या भागात पाऊस समाधानकारक झाला नसल्याने काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तर बहुतांश सर्वच भागात शेतीच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. याबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत असून जनावरांच्या पाण्याचा तसेच चार्‍याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे या पश्चिम जिरायत पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

येथील काही गावांनी टँकरचे प्रस्तावही दिले आहेत, परंतु अजून टँकर सुरू होत नसल्याची तक्रार यावेळी काही ग्रामस्थांनी बोलून दाखवली. दरवर्षी उन्हाळ्यात बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न असतोच. परंतु यावर्षी उन्हाळा जरा कडकच जाईल, अशी अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. अजून तीन महिने जनावरांना काय खाऊ घालायचे हा येथील पशुपालकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात होता तो ऊस, चारा पिके पाण्याअभावी जळून गेला. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणीही या भागात पैसे भरून वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी यावेळी सांगण्यात आल्या.

कर्ज भरण्यास शेतकर्‍यांचा नकार

पुढील आठवड्यात मार्चअखेर आल्याने पीक कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांनी पीककर्ज कसे भरायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. याबाबत अनेक ग्रामस्थांना याबाबत विचारले असता आम्ही पीक कर्ज भरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की इथे प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, शेतात कोणतेही पीक नाही, जनावरांना चारा नाही, विकतचा चारा किती दिवस खाऊ घालायचा, आम्ही घेतलेले पीक कर्ज भरायचे कुठून? यंदा खरं पीककर्ज माफीच व्हायला पाहिजे होती, कारण बारामती तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही कोणत्याच सुविधा या भागात मिळाल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया शेतकरी सचिन नलावडे, आबा बरकडे, अंकुश टकले आदींनी दिल्या.

नेते, कार्यकर्ते मात्र निवडणुकीत गुंग

या सर्व परिस्थितीत वरिष्ठ नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावनेते, कार्यकर्ते मात्र लोकसभेला कोण निवडून येईल, कोणाला किती मतदान होईल, कुणाचं पारडं जड होईल, खासदार सुप्रिया सुळे किंवा सुनेत्रा पवार यांना कितीचं लीड राहील या वेगवेगळ्या चर्चेत अडकले आहेत. मात्र याठिकाणी असणार्‍या शेती सिंचनाच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चार्‍याच्या समस्या याबाबत नेतेमंडळींना जाब कोण विचारणार आहेत की नाहीत असा सवाल वयस्कर तसेच पारावरची मंडळी करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button